Father donates liver to eight-month-old baby | आठ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी केले यकृत दान

आठ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी केले यकृत दान

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘बिलिअरी ॲट्रेसिया’ या यकृताच्या आजाराने जन्मतः ग्रस्त असलेल्या ओजस या आठ महिन्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी यकृताचा काही अंश दान केल्यामुळे बाळाचा जीव वाचला. अंधेरीतील ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल’मध्ये ही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी पार पडली.

‘बिलिअरी ॲट्रेसिया’ या आजारात यकृतातून स्रवणाऱ्या पित्तरसाच्या प्रवाहात अडथळे येतात. त्यामुळे यकृत व त्याच्या पेशी खराब होतात. हा आजार अखेरच्या टप्प्यात असलेल्या ओजसला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे हाेते. यकृत निकामी झाल्याने रक्त गोठण्याची क्षमता कमी झाली होती, तसेच त्याचे वजन अतिशय कमी झाले होते. प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने हे आव्हान स्वीकारले आणि तब्बल ११ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. वडिलांना शस्त्रक्रियेनंतर ५ दिवसांनी, तर ओजसला १५ दिवसांनी घरी सोडण्यात आले.

रुग्णालयाचे लिव्हर ट्रान्सप्लांट डॉ. सोमनाथ चटोपाध्याय म्हणाले, ओजसचा जन्म झाल्यावर काही आठवड्यांतच त्याला हा आजार असल्याचे निदान झाले होते. त्याची त्वचा पिवळी पडत हाेती. अर्भकांमध्ये १२ हजारांत एकाला हा दुर्मीळ आजार होतो. जन्मानंतर लगेचच त्याचे निदान झाले, तर शस्त्रक्रिया करून बाळाला बरे करता येते; मात्र शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण ४० टक्के इतकेच असते. ओजसच्या केसमध्ये दोन महिन्यांचा असताना त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती; परंतु त्यानंतर त्याला काविळ झाली, त्याच्या पोटात पाणी जमा होऊ लागले व शौचातून रक्त जाऊ लागले.

बाळाला यकृताचे दान करण्यास त्याचे वडील पुढे आले. शस्त्रक्रियेसाठी निधी जमा करण्यात काही स्वयंसेवी संस्था व मांडके फाउंडेशनची मदत झाली.

२५ टक्के भागाचे केले दान 

ओजसच्या वडिलांनी यकृताचा २५ टक्के भाग दान केला. तो ओजसच्या शरीरात बसवून रक्तवाहिन्यांना जोडण्यात आला. वडील आणि बाळ दोघांची प्रकृती व्यवस्थित सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. मानवी यकृताचे पुनरुज्जीवन होऊन ते आपल्या मूळ आकारात येत असते; त्या अनुषंगाने ओजसच्या वडिलांचे यकृत अल्पावधीतच पुन्हा मूळ आकारात येईल व व्यवस्थित कार्य करू लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Father donates liver to eight-month-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.