Fastag started on Bandra-Worli C-Link, six lanes in the first phase | वांद्रे-वरळी सी-लिंकवर फास्टॅग सुरू, पहिल्या टप्प्यात सहा मार्गिका
वांद्रे-वरळी सी-लिंकवर फास्टॅग सुरू, पहिल्या टप्प्यात सहा मार्गिका

मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंक मार्गिकेच्या पथकर नाक्याजवळ शुक्रवारपासून फास्टॅगची प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीने परिपूर्ण असलेला हा मुंबईतील पहिला पथकर नाका ठरला आहे.

टोल नाक्यांवर होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी देशामधल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर भरण्यात येणारा टोल हा फास्टॅगमार्फत भरण्यात यावा, असा निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. मात्र, मुंबईच्या टोल नाक्यांवर ही प्रणाली सुरू झाली नव्हती. आता ती कार्यान्वित केल्याची घोषणा एमएसआरडीसीने शुक्रवारी केली.

राज्यभरातील फास्टॅग प्रणालीसाठी पथकर नाक्यांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नियुक्ती केली आहे. त्याअंतर्गत मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर शुक्रवारी फास्टॅग प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला.

सागरी सेतूच्या पथकर नाक्यावर एकूण सोळा मार्गिका आहेत. पहिल्या टप्प्यात पथकर नाक्यावरील सहा मार्गिका या फास्टॅग वाहनधारकांसाठी राखीव असतील. पुढील काही दिवसांमध्ये आणखी सहा मार्गिका फास्टॅगमध्ये रूपांतरित करण्यात येतील. उर्वरित चार मार्गिका या रोख भरणा (कॅश पेमेंट) म्हणून राहतील. सागरी सेतूवरील पथकर नाक्यावरील फास्टॅग प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल. नाक्यावर रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. मुंबईतील इतर पथकर नाक्यांवर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे, असे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

पथकर नाक्यावर फास्टॅग
वाहनचालकांना फास्टॅग विकत घेण्यासाठी पथकर नाक्यावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयडीएफसी बँकेमार्फत पथकर नाक्यावर ’पॉइंट आॅफ सेल’ची उभारणी केली असून त्या ठिकाणी फास्टॅग मिळू शकेल.

मासिक पासधारक : वांद्रे-वरळी सी-लिंकच्या मासिक पासधारकांचा पास नेहमीच्या प्रचलित पद्धतीनुसार पासच्या वैधतेपर्यंत वापरता येईल. फास्टॅगमुळे त्यावर काहीही परिणाम होणार नाही. भविष्यात सर्व ‘मासिक पास’ सुविधा फास्टॅगमार्फत करण्यात येईल. त्यासाठी मासिक पासधारकांना एमईपी कंपनीमार्फत मार्च २०२० पर्यंत फास्टॅग प्रणालीत परिवर्तित होण्याची मुभा आहे.

Web Title: Fastag started on Bandra-Worli C-Link, six lanes in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.