Join us

२६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, वांद्रे-वरळी सेतूसाठी नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:55 IST

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारण पुढील दोन महिन्यांत या सर्व नाक्यांवर फास्टॅगचा वापर बंधनकारक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, मुंबई-पुणे जुना महामार्ग (एनएच ४८) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवर २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले.

एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आणि जुन्या महामार्गावर सर्व टोल प्लाझांच्या सर्व मार्गिकांवर सध्या फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र वाहनचालकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, सर्वांना फास्टॅग घेण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून २६ जानेवारीपर्यंत काही मार्गिका हायब्रिड (रोख आणि फास्टॅग दोन्ही एकत्र) पद्धतीने कार्यरत राहतील. २६ जानेवारीपासून मात्र फास्टॅग बंधनकारक असेल. मुंबईतील वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरही फास्टॅग बंधनकारक आहे.

मुंबईच्या हद्दीतील पाच टोल नाके एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असून, दहिसर वगळता चार टोल नाक्यांच्या काही मार्गिकावर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून महामंडळाने पुढाकार घेऊन फास्टॅग कार्यरत केले. सर्व मार्गिकांवर फास्टॅग यंत्रणा कार्यरत करण्यासाठी तेथील रचनेत बदल तसेच काही ठिकाणी अतिरिक्त जागा अपेक्षित आहे. मात्र मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) आणि दहिसर येथील नाक्यांवर तशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी एमएसआरडीसीने पालिकेकडे अतिरिक्त जागा भाडेपट्टीवर मागितल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारण पुढील दोन महिन्यांत या सर्व नाक्यांवर फास्टॅगचा वापर बंधनकारक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्ररस्ते वाहतूक