फॅशन स्ट्रीटला लाभणार इंटरनॅशनल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:09 IST2024-12-09T10:09:17+5:302024-12-09T10:09:32+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आकर्षक तयार कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट आहे. एका लांबलचक फुटपाथवर असलेल्या ११२ दुकानांचे ‘फॅशन स्ट्रीट’ आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. 

Fashion Street will get an international look | फॅशन स्ट्रीटला लाभणार इंटरनॅशनल लूक

फॅशन स्ट्रीटला लाभणार इंटरनॅशनल लूक

- सीमा महांगडे
प्रतिनिधी
मूळ किमतीच्या अर्ध्या किमतीपर्यंत कपडे खरेदीचे स्वातंत्र्य देणारे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’ किंवा तरुणांच्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘एफएस’. मुंबईतील प्रत्येक बाजाराचे एक खास वैशिष्ट्य आहे. ससून डॉकवर चालणारी माशांची बोली, कुलाबा मार्केटमध्ये मिळणारे नव्या धाटणीचे दागिने, तांबा-काटा मार्केटमध्ये कमी होत जाणाऱ्या अस्सल तांब्या-पितळेच्या वस्तू, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या सात ते आठ मिनिटांवर वसलेले फॅशन स्ट्रीटचे स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे. मात्र, पुरेशा जागेअभावी होणारी गर्दी आणि अन्य गैरसोयी यांचा फटका ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही बसत असल्याचे लक्षात घेता फॅशन स्ट्रीटला नवीन रूप देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. येथील दुकानांची रचना बदलण्याबरोबरच खरेदीला येणाऱ्यांसाठी विविध सुविधाही दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेकओव्हरनंतर फॅशन स्ट्रीट मुंबईकरांना नव्या ढंगात, नव्या रूपात पाहायला मिळेल.  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानकांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आकर्षक तयार कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट आहे. एका लांबलचक फुटपाथवर असलेल्या ११२ दुकानांचे ‘फॅशन स्ट्रीट’ आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. 

कपड्यांच्या मोठ्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांबरोबरच पर्यटकही फॅशन स्ट्रीटकडे फिरकल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, येथील गाळ्यांनी जवळपास अर्धा पदपथ व्यापला आहे. त्यामुळे ग्राहकांना चालण्यासाठी जागाच नसते. या भागात बसण्यासाठी आसन व्यवस्थाही नाही. तसेच, चांगले स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय होते. 
फॅशन स्ट्रीट आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या महापालिकेच्या चौक्यांमुळे क्रॉस मैदान आणि आझाद मैदान पूर्णपणे झाकले जाते. यासाठी दुकाने आणि महापालिका चौक्या यांच्या रचनेतही बदल केला जाणार आहे. 

तसेच, दोन्ही मैदाने व्यवस्थित दिसतील, अशी  व्यवस्था केली जाणार आहे. दोन ते तीन दुकानांमध्ये काही अंतर ठेवले जाईल. तसेच, सध्या फूटपाथ व्यापून टाकणाऱ्या दुकानांना मागे सरकवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांना चालण्यासाठी मोकळी जागा मिळू शकेल. आगीसारखी दुर्घटना घडू नये, याचीही दक्षता प्रामुख्याने घेतली जाणार आहे. 

कपड्याबरोबरच येथे चपला, शूज, दागिने अशा अन्य गोष्टींचीही रेलचेल असते. त्यातही शनिवार आणि रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी, तर येथे मोठी गर्दी होते. त्यामुळे येथे येणाऱ्या  ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहेदेखील उभारली जाणार आहेत. 
शिवाय पालिकेकडून मुंबईत विविध ठिकाणी जी ५० फूड ट्रकची सुविधा उपलब्ध केली आहे, त्यातील काही सेवा फॅशन स्ट्रीट येथेही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. परदेशाप्रमाणेच सायंकाळनंतर फूड ट्रकसारख्या सेवेमुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना विविध खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. 

मॉलसारख्या ठिकाणी सर्व ब्रॅण्डचे कपडे एकाच छताखाली खरेदी करता येतात. तेथील चकचकीतपणा, रोषणाई आणि वातावरणातील सैलपणा तरुणाईला मॉलकडे आकर्षित करतो. मात्र, फॅशन स्ट्रीटवर यापैकी काहीच नसतानाही तरुणवर्गाचे या बाजाराबद्दलचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही. त्यामुळे पालिकेने मेकओव्हर केल्यानंतर ‘एफएस’ नव्याने ‘फॅशन’मध्ये येईल, असे निश्चित म्हणता येईल.

Web Title: Fashion Street will get an international look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई