फेमस स्टुडिओ बंद; असंख्य कलाकारांच्या जीवनातील चढ-उतार पाहिलेल्या दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूवर पडणार हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:23 IST2025-10-01T13:22:41+5:302025-10-01T13:23:11+5:30
तब्बल ८० वर्षांपासून हिंदी-मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला महालक्ष्मी येथील डॉ. ई. मोझेस रोडवरील फेमस स्टुडिओ आता दिसणार नाही. मंगळवार हा या स्टुडिओसाठी शेवटचा दिवस ठरला.

फेमस स्टुडिओ बंद; असंख्य कलाकारांच्या जीवनातील चढ-उतार पाहिलेल्या दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूवर पडणार हातोडा
मुंबई : लाइट... कॅमेरा... ॲक्शन म्हणत सिनेमा, टीव्ही, मालिका आणि जाहिरातींसह कॉर्पोरेट्स शूट्ससाठी प्रसिद्ध असलेला आणि तब्बल ८० वर्षांपासून हिंदी-मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासाची साक्ष देत उभा असलेला महालक्ष्मी येथील डॉ. ई. मोझेस रोडवरील फेमस स्टुडिओ आता दिसणार नाही. मंगळवार हा या स्टुडिओसाठी शेवटचा दिवस ठरला. हा स्टुडिओ बंद झाला असून, त्याच्यावर हातोडा पडणार आहे.
१९४५मध्ये सुरू झालेल्या फेमस स्टुडिओने ८० वर्षांत चढ-उतारांनी भरलेले आयुष्य असलेले असंख्य कलाकार घडताना पाहिलेच, परंतु सिनेसृष्टीतील बदल, स्थित्यंत्तरे तसेच उतार-चढावही अनुभवले. फेमसमध्ये अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिरातींसह कॉर्पोरेट शूट्स झाले. पूर्वी कोणत्याही हिंदी-मराठी चित्रपटाचा प्रेस शो फेमसमध्ये व्हायचा. गेल्या १० वर्षांमध्ये हिंदीचा कारभार अंधेरीमध्ये स्थलांतरीत झाल्याने तसेच मीडियाचे प्रस्थ वाढल्याने फेमसमधील हिंदी चित्रपटांच्या प्रेस शोचे प्रमाण कमी झाले.
६५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा
फेमस स्टुडिओच्या दीड एकर जागेच्या हस्तांतरणासाठी विकासकासोबत सुमारे ६५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. सध्याच्या नियोजनानुसार या भूखंडावर अंदाजे ४ लाख चौरस फूट विकासाची क्षमता आहे. पण, अंतिम क्षमता महापालिकेच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचे समजते. २०१२मध्ये पिरामल रिअल्टीने मालकांशी संयुक्त करार करून फेमसच्या जागेवर आलिशान अपार्टमेंट्स बांधण्याची योजना आखली होती. सुमारे ३५० कोटी रुपयांचा हा व्यवहार व्यावसायिक अटींवरील मतभेदांसोबतच इतर गुंतागुतींच्या मुद्द्यांमुळे फिस्कटला होता.
दशावतारचा प्रेस शो ठरला शेवटचा
सध्या सिनेमागृहे गाजवणाऱ्या ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाचा शो इथला अखेरचा प्रेस शो ठरला. फेमसने मनोरंजन उद्योगातील बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार डिजिटल पोस्ट - प्रॉडक्शन सेवा सुरू करून कार्यक्रम आणि प्रीव्ह्यूसाठीही विस्तार केला. पण, जमिनीचे व्यावसायिक मूल्य झपाट्याने वाढल्याने पुनर्विकास हा अधिक आकर्षक पर्याय बनला. त्याचा फटका या फेमस स्टुडिओला बसल्याचे समोर आले आहे.
मिनी थिएटरवर भीस्त
चित्रा सिनेमागृह आणि राजकमल स्टुडिओतील प्रीव्ह्यू थिएटर बंद आहे. प्लाझा सिनेमागृहामध्ये असलेले प्रीव्ह्यू थिएटर तांत्रिकदृष्ट्या सोयीस्कर नाही. फेमस बंद झाल्याने फक्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर प्रीव्ह्यूसाठी उपलब्ध राहणार आहे.
देव आनंद यांचे कार्यालय
देव आनंद यांच्या नवकेतन फिल्म्सचे कार्यालय स्थापनेपासून फेमसमधील १४७ क्रमांकाच्या रुममध्ये होते. संगीतकार शंकर - जयकिशन जोडीतील शंकर यांची सिटिंग रुमही इथे होती.
प्रीव्ह्यू थिएटर
प्रीव्ह्यू थिएटर हे फेमसचे वैशिष्ट्य आहे. इथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेस शो दाखवले जायचे. दिग्गज कलाकारांनीही इथे सिनेमे पाहिले. काही वर्षांपूर्वी याचे नूतनीकरणही करण्यात आले होते.
दिग्गजांचे शूट
इथे निर्मिती संस्थांना दीर्घकाळासाठी भले मोठे सेट लावणे शक्य होते. रितेश देशमुख, राणी मुखर्जीसह बऱ्याच आघाडीच्या कलाकारांनी इथे शूट केले. इगल फिल्म्स, उमेश मेहरा, राजीव मेहरा, राम महेश्वरी, विजय गणांत्रा आदी मोठे निर्माते आणि निर्मिती संस्थांची कार्यालये इथे होती. राज कपूर, यश चोप्रा, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटांचे पीआर बनी रुबेन यांचे कार्यालयही होते.