Join us  

यंदा प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द; भराडी देवीला घरूनच नमस्‍कार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 8:19 PM

Anganewadi Yatra canceled: कोरोनाचा प्रसार होऊ नये या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवूनच आंगणेवाडीवासियांनी  हा निर्णय घेतला असल्‍याची माहिती सामंत व आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्‍कर आंगणे यांनी दिली. 

मुंबई : महाराष्‍ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेली मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीची यात्रा यंदाच्या वर्षी सर्वसाधारण भाविकांना खुली असणार नाही.केवळ आंगणे कुटुंबियच देवीचे दोन दिवसांचे पारंपारिक धार्मिक पूजाविधी पूर्ण करणार आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रपरिषदेत सोमवारी ही माहिती दिली. (Bharadi devi's Anganewadi jatra cancelled this year.)

कोरोनाचा प्रसार होऊ नये या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवूनच आंगणेवाडीवासियांनी  हा निर्णय घेतला असल्‍याची माहिती सामंत व आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्‍कर आंगणे यांनी दिली. 

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ही पर्वणीच असते.लाखो भाविक विशेषतः कोकणातील,मुंबईतील भाविक दरवर्षी नित्‍यनेमाने आंगणेवाडीला जात असतात.बडे राजकारणी नेतेही मोठया संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. दर वर्षी सहा ते सात लाख भाविक यात्रेला येतात. यंदादेखील ६ मार्च रोजी आंगणेवाडीची यात्रा आहे. मात्र लॉकडाउन लागू होण्याच्या आधीच आंगणेवाडी ग्रामस्‍थांनी कोरोनाचे नियम पाळायला सुरूवात केली होती. सर्व सण त्यांनी घरीच साजरे केले. आंगणेवाडी ग्रामस्‍थांनी  हाच आदर्श ठेवत यंदाची यात्रा बाहेरच्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

केवळ आंगणेवाडीवासीयच या दोन दिवसांत श्री भराडी देवीचे जे पारंपारिक पूजाविधी असतील ते पूर्ण करणार आहेत. इतर भाविकांनी आपल्‍या घरूनच श्री भराडी देवीला नमस्‍कार करावा, असे आवाहन भास्‍कर आंगणे तसेच उदय सामंत यांनी केले. 

टॅग्स :आंगणेवाडीसिंधुदुर्गउदय सामंत