False is your promise ... BJP's banner-waving against the ruling party again in Thane | झुठा है तेरा वादा... भाजपची ठाण्यात पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बॅनरबाजी

झुठा है तेरा वादा... भाजपची ठाण्यात पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बॅनरबाजी

ठाणे : ठाण्यात बॅनरवॉर अद्यापही संपुष्टात आला नसल्याचे दिसत असून क्या हुवा तेरा वादा म्हणत असतांना भाजपने ठाण्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणखी एक बॅनर लावले आहे. या बॅनरवर आता ‘झुठा है तेरा वादा’... म्हणत सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तर ५०० चौ. फुटांच्या घरांना अद्यापही करमाफी न दिल्याचा निषेध या बॅनरवर नोंदविला आहे. त्यामुळे आता शिवसेना याला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
                        मागील काही दिवसापासून ठाण्यात जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. आधी सत्ताधाºयांनी बॅनरबाजी करुन आम्ही ठाणेकरांना काय दिले हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर याच बॅनरवरुन मनसे आणि भाजपने प्रतिउत्तर देत बॅनरबाजी केली होती. काही दिवसांपूर्वी मनसेने ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा यासाठी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. तर याच वेळेस भाजपने देखील शहरभर बॅनर लावत क्या हुवा देरा वादा म्हणत सत्ताधारी शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आठवण करुन दिली होती. परंतु सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने तुर्तास करमाफी शक्य नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
त्यानंतर आता अवघ्या काही दिवसातच शहरात पुन्हा भाजपने लावलेल्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या बॅनवर सत्ताधारी शिवसेनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. झुठा है तेरा वादा... म्हणत शिवसेनेला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या वचननाम्याची पुन्हा आठवण करुन देण्यात आली आहे. या बॅनरवर ५०० चौ. फुटांच्या घरांचा कर माफ केला नाही, वारेमाप पाणी बिलातून आणले डोळ्यात पाणी, पाण्याचा दर चौरस फुटावर ठरवून जिझीया कर लादणारी एकमेव महापालिका, जबरदस्त झटा देणारी वीजेची बिले असे काही मुद्दे मांडले असून अजब तुझे सरकार गजब तुझा कारभार अशी टिकाही या बॅनरद्वारे केली आहे.

निवडणुकांना अजून वेळ आहे, भाजपवाल्यांना उद्याच निवडणुका असल्याचे दिवा स्वप्न पडलेले आहे. त्यातूनच ते नको ते मुद्दे घेऊन आपले अस्तित्व असल्याचे दाखविण्यासाठी हा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाबरोबर आमचे प्रयत्न सुरु आहेत, त्या प्रयत्नांचे ठाणेकर नागरीक कौतुक करीत आहेत. परंतु दुसरीकडे याच नागरीकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: False is your promise ... BJP's banner-waving against the ruling party again in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.