माहीम रेल्वे स्थानकात तिकीट विक्रीचा भ्रष्टाचार, प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता तिकीटे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:36 IST2025-07-07T16:35:33+5:302025-07-07T16:36:27+5:30
पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनमध्ये तिकीट विक्री करणाऱ्या बोगस व्यक्तीस रेल्वेच्या दक्षता विभागाने पकडले.

माहीम रेल्वे स्थानकात तिकीट विक्रीचा भ्रष्टाचार, प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता तिकीटे!
पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनमध्ये तिकीट विक्री करणाऱ्या बोगस व्यक्तीस रेल्वेच्या दक्षता विभागाने पकडले. विनोद दवांगे असे त्याचे नाव असून गणेश पाटील या तिकीट बुकिंग क्लार्कच्या सांगण्यावरुन तो हे काम करत होता.
दक्षता विभागाच्या तपासणीदरम्यान तिकीट विक्री कर्मचाऱ्यांकडून कामामध्ये कसूर आढळून आल्याने चार तिकीट बुकिंग क्लार्कना तक्काळ निलंबित करण्यात आले आहे. सध्या कोणालाही अटक झाली नसून या सर्वांची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहीम स्थानकावरील तिकीट खिडकीवर रेल्वे कर्मचारी नसलेली व्यक्ती रेल्वे तिकीटांची विक्री करत असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता रेल्वे दक्षता माहीम स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरील खिडक्यांवर क्रमांक ५ वर विनोद दवांगे हा तिकीटे देताना आणि सरकारी रोख रक्कम हाताळताना त्यांनी पाहिले. तपासणीदरम्यान, तो रेल्वे कर्मचारी नसून प्रिंटर दुरुस्ती करणारा असल्याचे समजले.
दक्षता पथकाने रात्री ८.३० च्या सुमारास स्टेशन मास्टरच्या उपस्थितीत बुकिंग कार्यालयात प्रवेश केला. यावेली चीफ बुकिंग सुपरवायझर अंगद देविदास ढवाले, शिफ्ट इन्चार्ज रामाशंकर आर. आणि दोन बुकिंग क्लर्क गणेश पाटील व विजय देवडीगा हे एका खोलीत बसून नाश्ता करत असल्याचे आढळले. दरम्यान यावेळी केवळ एकच खिडकी सुरू असून विनोद दवांगे हा तिकीट विक्री करत असल्याचे आढळून आले.
२,५६० रुपये जप्त
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरुन तिकीट काउंटर चालवत असल्याचे विनोद दवांगे याने कबूल केले आहे. त्याच्याकडून २,५६० रुपये जप्त करण्यात आले. ते सरकारी खात्यात जमा करण्यात आले आहे. खिडकी क्रमांक पाच आणि सहामधून अनुक्रमे ३४ रुपये आणि ४५ रुपयांची अतिरिक्त सरकारी रोख रक्कमही दक्षता पथकाला तपासणीत सापडली.
आरपीएफचा तपास सुरु
रेल्वे प्रशासनाने चारही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून आरोपी विनोद दवांगे याला आरपीएफच्या ताब्यात दिले. याप्रकरणी आरपीएफने तपास सुरू केला आहे.