आरक्षणाच्या खोट्या अधिसूचना व्हायरल; विश्वास न ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:50 IST2025-09-19T11:48:52+5:302025-09-19T11:50:35+5:30
गेली तीन वर्षे पालिकेची निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक येत्या तीन-चार महिन्यांत होणार आहे. त्याकरिता नव्या प्रभाग रचनेवर ४९२ हरकती-सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली.

आरक्षणाच्या खोट्या अधिसूचना व्हायरल; विश्वास न ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असली तरी अद्याप प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. असे असतानाही पालिकेच्या नावे खोट्या प्रभागनिहाय आरक्षणाची कागदपत्रे समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, प्रभागनिहाय आरक्षणाकरिता सरकारने कोणत्याही स्वरूपाची सोडत किंवा त्याबाबतची अधिसूचना जाहीर केलेली नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
गेली तीन वर्षे पालिकेची निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक येत्या तीन-चार महिन्यांत होणार आहे. त्याकरिता नव्या प्रभाग रचनेवर ४९२ हरकती-सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली. प्रभागांच्या सीमांकनात बदल झाल्याने काही माजी नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
... म्हणून सर्वांच्या आरक्षणाकडे नजरा
निवडणुकीत सोयीचा प्रभाग मिळावा, यादृष्टीने इच्छुक पावले उचलत आहेत. काही उमेदवार हे आपला पत्ता उघड करत नसून, आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे आरक्षणावर पक्ष आणि इच्छुकांच्या नजरा खिळल्या आहेत.
महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच खुल्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग असतील, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्यानुसार उमेदवार निश्चित होणार आहेत.
राजकीय पक्षांनी आखली रणनीती
२०१७ च्या निवडणुकीनुसारच वॉर्ड असल्याने प्रभाग रचनेत फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे फायदा व तोटा कोणाला होणार, याचा अभ्यास करून सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळाली तरी,
त्यांना नवीन प्रभाग रचनेमुळे प्रचारासाठी गल्लोगल्ली पालथी घालावी लागणार आहे. प्रभाग आरक्षणाच्या सोडतीवरही बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक दिसून येत आहे.