Join us

मोबाइल, लॅपटाॅपच्या बनावट ऑर्डर; बाउन्स मेलमुळे गुन्हा आला उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 11:17 IST

अडीच कोटींच्या फसवणूक प्रकरणात मॅनेजरवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका बाउन्स झालेल्या मेलमुळे जवळपास २.५९ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालकाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी  बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर धार्मिकभाई चौहान (३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

तक्रारदार संदीप भट (३७) यांचा रिवॉर्ड मॅनेजमेंट व कॉर्पोरेट गिफ्टिंगचा व्यवसाय आहे. ते मालाडमधील रुस्तमजी ओझोन मॉल परिसरात पत्नीसह तो चालवतात. भट यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे २०२१ मध्ये आरोपी चौहान हा सहा महिन्यांच्या प्रोबेशन पिरियडवर रुजू झाला. त्याने या काळात त्याचे काम चोखपणे पार पाडत भट आणि त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन केला. मालकाचा विश्वास बसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भट यांना विनंती केली की कंपनीला आलेल्या ऑर्डर्स तो स्वतः व्यक्तिशः हॅण्ड डिलिव्हरी करेल जेणेकरून कंपनीचे नाव मोठे होईल. 

 भट यांनी त्याच्यावर विश्वास असल्याने परवानगी दिली. त्यानंतर तो स्वतःच ऑर्डर घेऊन पाठवू लागला.  दोन कोटींच्या आसपास पैसे मार्केटमध्ये अडकल्याचे लक्षात आल्यावर भट यांनी स्वतःच याचा पाठपुरवठा करण्याचे ठरवले.

मोबाइल, लॅपटाॅपच्या बनावट ऑर्डर चौहानने व्यवहार केलेल्या एका ई-मेल आयडीवर त्यांनी थकबाकीबाबत मेल पाठवल्यावर तो बाउन्स झाला. त्यावेळी त्यांना संशय आला आणि त्यांनी ईमेल आयडी नीट तपासल्यावर तो एडिट केल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौहानने अशा प्रकारे लॅपटॉप, मॅकबुक, मोबाइल फोन आणि आय फोन मोबाइल ॲक्सेसरीजची बनावट ऑर्डर घेऊन  अपहार केल्याचा भट यांनी आरोप केला.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई