बनावट पावत्या देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक हजार कोटींचे व्यवहार रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 06:01 IST2023-07-27T06:00:57+5:302023-07-27T06:01:14+5:30
व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहाराच्या बोगस पावत्या देऊन बनावटरीत्या इनपूट क्रेडिट प्राप्त करून देणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाने पर्दाफाश केला आहे.

बनावट पावत्या देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक हजार कोटींचे व्यवहार रडारवर
मुंबई : व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहाराच्या बोगस पावत्या देऊन बनावटरीत्या इनपूट क्रेडिट प्राप्त करून देणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाने पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये जवळपास १६० कंपन्यांचा समावेश असून, बहुतांश कंपन्या धातू व भंगाराच्या उद्योगाशी संबंधित आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक झाली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत या टोळीने सामान्य लोकांकडून त्यांच्या ओळखपत्राच्या प्रती, छायाचित्र, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी घेतले होते. या कागदपत्रांच्या आधारेच या लोकांचे जीएसटी क्रमांक काढण्यात आले व त्यांच्या नावे आर्थिक व्यवहार झाल्याचे दाखवत त्या व्यवहारावर इनपूट क्रेडिट प्राप्त करण्याचा उद्योग ही टोळी करत होती.
कंपन्या केवळ कागदोपत्री
प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ज्या लोकांच्या नावे हे जीएसटी क्रमांक आहेत, त्या पत्त्यांचा व त्यांचा ज्या कंपन्यांशी संबंध आल्याचे दाखवले होते, त्या कंपन्यांचा शोध घेतला असता बहुतांश कंपन्या कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. तर ज्यांच्या नावाचे जीएसटी क्रमांक आहेत, त्यांना याची कोणतीही कल्पना नसल्याचेदेखील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर या प्रकरणाचा शोध घेत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सरकारी तिजोरीतून उकळले २०६ कोटी
या टोळीने १६० कंपन्यांसोबत या ‘उद्योगासाठी’ संधान साधले होते. अशा प्रकारच्या बोगस पावत्यांच्या आधारे टोळीने आतापर्यंत २०६ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून उकळल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जवळपास एक हजार कोटींचे आणखी व्यवहार केल्याचा जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे.