बोगस डॉक्टर आता पटकन ओळखता येणार, QR कोड स्कॅन करा, सगळी माहिती मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:33 IST2025-08-08T17:32:27+5:302025-08-08T17:33:30+5:30
बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना तीन महिन्यांपूर्वीच मेलद्वारे लिंक पाठवून 'क्यूआर कोड' डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बोगस डॉक्टर आता पटकन ओळखता येणार, QR कोड स्कॅन करा, सगळी माहिती मिळणार...
बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना तीन महिन्यांपूर्वीच मेलद्वारे लिंक पाठवून 'क्यूआर कोड' डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा कोड त्यांना क्लिनिकमध्ये नावाच्या पाटीसमोर लावायचा आहे. तो स्कॅन करताच डॉक्टर खरा की बोगस, हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समजणार आहे.
राज्यातील विविध भागांत अनेक वर्षापासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. जिल्हास्तरावर या बोगस डॉक्टरांना प्रतिबंध करण्यासाठी समितीही नेमली आहे. मात्र, तरीही बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येतच असतात. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतर्फे 'आपला डॉक्टरला ओळखा' हा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
डॉक्टरांची माहिती, शिक्षण
या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला क्यूआर कोड दिला आहे. त्यामध्ये सर्व डॉक्टरांची माहिती व शिक्षण उपलब्ध असेल. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कौन्सिलचे काम सुरू होते. अखेर ते काम पूर्ण झाले आहे.
१ लाख ८० हजारांहून अधिक डॉक्टर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य आहेत. डॉक्टरांच्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आणि त्यांची सर्व माहिती ठेवण्याचे काम परिषद करते. मात्र, आजच्या घडीला क्यूआर कोड अजूनही बंधनकारक केलेला नाही.
आतापर्यंत १० हजार डॉक्टरांनी क्यूआर कोड घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना सहज डॉक्टरांची माहिती मिळते. या कोडमुळे बोगस डॉक्टरांना आळा घालणे सहज शक्य आहे. तर रुग्णाला आपण कोणत्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहोत, याची माहिती मिळेल तसेच संबंधित डॉक्टरांचा परवाना नूतनीकरण झाला आहे का, ते कळणार आहे. जिल्हास्तरावरील समितीतही एक डॉक्टर असावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
- डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद