ग्रामीण भागासह शहरातही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; दवाखाने उघडून बिनधास्त करतात उपचार, रुग्णांच्या जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:16 IST2026-03-14T13:16:17+5:302026-03-14T13:16:48+5:30
वैध वैद्यकीय पदवी नसतानाही अनेक बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडली आहेत. ग्रामीण भागांसह शहरांमध्येही अशा बनावट डॉक्टरांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

ग्रामीण भागासह शहरातही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; दवाखाने उघडून बिनधास्त करतात उपचार, रुग्णांच्या जीवाला धोका
मुंबई : वैध वैद्यकीय पदवी नसतानाही अनेक बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडली आहेत. ग्रामीण भागांसह शहरांमध्येही अशा बनावट डॉक्टरांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. लहान दवाखाने उघडून ते उपचार देत असल्याचे आढळते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
कावीळ, मूळव्याध, लैंगिक समस्यांसह कॅन्सरवर उपचार करण्यात येतील, असा दावा करणारे हे तथाकथित डॉक्टर त्वचारोग, वंध्यत्व या आजारांवरही “हमखास उपचार” करण्याचा दावा करतात. यामुळे अनेक रुग्ण योग्य उपचारांपासून वंचित राहतात. हे डॉक्टर उपचारांच्या नावाखाली गंडा घालतात. या बनावट डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसते. अनेकदा बनावट प्रमाणपत्रे लावून रुग्णांना फसवले जाते. काही ठिकाणी अघोरी पद्धतीचे उपचार, गुप्त औषधे किंवा पुडीत भरून दिलेली औषधे देण्याचे प्रकारही उघड झाले आहेत. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारे कंपाउंडरदेखील दवाखाना सुरू करतात. अनुभवाच्या आधारावर उपचार देत असल्याचा दावा करून ते रुग्णांना औषधे देतात. डॉक्टरकडे अधिकृत वैद्यकीय पदवी, नोंदणी क्रमांक आहे का हे तपासणे गरजेचे आहे.
बोगस डॉक्टर शोधणे सोपे काम आहे. वैद्यकीय पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी केली जाते. महापालिकेने बोगस डॉक्टरांचा शोध घेणे आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्र व वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र तपासल्यावर याची माहिती मिळते. क्लिनिकमध्ये क्युआर कोड लावण्याचा उपायदेखील चांगला आहे.
डॉ. अनिल पाचणेकर,
माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
राज्यभरात अनेकांवर गुन्हे दाखल
आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या कारवाईत गेल्या वर्षभरात राज्यातील विविध जिल्ह्यात अनेक बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. काहींना अटकही झाली आहे. मात्र, अशा बनावट डॉक्टरांचे जाळे अजूनही पूर्णपणे मोडीत निघालेले नाही, अशी स्थिती आहे.