Mumbai Crime: एखाद्या थरारक गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकेल अशी धक्कादायक घटना मुंबईच्या चांदिवली परिसरात समोर आली आहे. पवईतील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये महिलेने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर हे क्रूर हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे. प्रेमप्रकरणातील अडथळा दूर करण्यासाठी एका पतीने तब्बल ६.७ लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या पत्नीची हत्या घडवून आणली.
तीन अयशस्वी प्रयत्न आणि शेवटचा वार
साकिनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय सखाराम चौधरी याला आपल्या ३५ वर्षीय पत्नीचा नांरगी ऊर्फ गीता चौधरीचा काटा काढायचा होता. सखारामचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्यासोबत संसार थाटायचा होता. यासाठी त्याने २०२४ पासूनच पत्नीला संपवण्याचे कटकारस्थान रचले होते. धक्कादायक बाब म्हणजे, याआधी त्याने तीन वेळा पत्नीला मारण्याचे प्रयत्न केले होते, परंतु नशिबाने ती प्रत्येक वेळी बचावली. अखेर चौथ्या प्रयत्नात सखारामने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने तिचा जीव घेतला.
आरे कॉलनी हल्ला (पहिला प्रयत्न): जेवण करून परतताना गीता यांच्यावर वजनदार वस्तूने हल्ला करण्याचा प्लॅन होता. मात्र, रस्त्यावर लोक असल्यामुळे हा बेत फिस्कटला.
रस्ते अपघात (दुसरा प्रयत्न): गीता यांना गाडीखाली चिरडण्याचा कट रचला गेला होता. पण, त्या आपल्या मुलाला शाळेत सोडताना नेहमी फुटपाथवरून चालत असत, ज्यामुळे हा प्रयत्नही अयशस्वी ठरला.
ट्रेनमधून ढकलण्याचा कट (तिसरा प्रयत्न): चालत्या ट्रेनमधून गीता यांना ढकलून देण्याबाबत आरोपींनी चर्चा केली होती. पण, हा प्लॅनही ते अमलात आणू शकले नाहीत.
असा रचला सुसाईडचा बनाव
शेवटी गीता यांची त्यांच्याच घरात हत्या करण्याचा कट रचण्यात आला. सखारामने या कामासाठी आपला जुना साथीदार शंकर डांगी याला ६.७ लाख रुपयांची सुपारी दिली होती. शंकरने अमरचंद गायरी आणि दिनेश गायरी या दोन तरुणांना सोबत घेऊन हत्येचा प्लॅन आखला. घटनेच्या दिवशी घरात कोणी नसताना या नराधमांनी गीता यांचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार वाटावा, यासाठी त्यांनी मृतदेह छताच्या पंख्याला लटकवून दिला.
वडिलांच्या संशयाने नराधम नवरा अडकला
सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, गीता यांच्या वडिलांना सखारामवर संशय आला. त्यांनी पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची मागणी लावून धरली. दुसऱ्यांदा झालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात गीता यांचा मृत्यू गळफास घेतल्याने नाही, तर गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या एका पुराव्यामुळे सखारामचा कट सपशेल फसला.
पोलिसांची मोठी कारवाई
साकिनाका पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे सखाराम चौधरीसह त्याचे तीनही साथीदार यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या हत्येसाठी वापरलेले पैसे आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे चांदिवली आणि पवई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.