आमने-सामने: सत्ताधारी पक्षाचे आमदार दादागिरी करतात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:45 IST2022-11-06T05:45:44+5:302022-11-06T05:45:56+5:30
कुणी ए बोलले तरी त्याने मला शिवीगाळ केली, असे सध्या चालले आहे. छोट्या गोष्टीला मोठे करणे सुरू आहे.

आमने-सामने: सत्ताधारी पक्षाचे आमदार दादागिरी करतात का?
शब्दांकन : दीपक भातुसे
कुणी ए बोलले तरी त्याने मला शिवीगाळ केली, असे सध्या चालले आहे. छोट्या गोष्टीला मोठे करणे सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी असे वादविवाद होतात. अधिकारी अनेक तास काम करतात, काही वेळा ते तणावाखाली असतात. काही आमदार आणि लोकप्रतिनिधी मंत्रालयात येतात तेव्हा त्यांना आपल्या माणसांना मंत्रालयात प्रवेश मिळावा, असे वाटते.
संतोष बांगर म्हणाले, ठोकून काढू, असे सांगितले जात आहे. मग, त्यांनी मारहाणच केली असती ना; पण इथे हातही लावला नाही. मागच्या सरकारमध्ये काही मंत्र्यांची मुले ज्यांना मोठी सुरक्षा होती, ते हॉटेल बंद झाल्यानंतही तेथे काय करायचे, काय पद्धतीने वागायचे, काय पद्धतीने बोलायचे त्यावर सतत पांघरुण घातले जायचे. संतोष बांगर हे एका पोलीस शिपायाला बोलले तर ती बातमी बनते; पण सी लिंकवर दोन स्पोर्ट्स कारने कोणाला उडवले तर त्याची साधी बातमी दाखवली जात नाही. कारण, गाडीचा मालक कोण आहे, ते बघितले जाते. कुत्रा कुणाला चावला हे महत्त्वाचे नाही, कुत्रा कुणाच्या मालकीचा आहे, हे महत्त्वाचे झाले आहे. रेस्टॉरंटमध्ये लोअर परळला एका आमदाराच्या मुलाला मारहाण झाली, त्याचा गाजावाजा झाला का? काही अधिकाऱ्यांना असे वाटते, तुम्ही आमचे काही करू शकत नाही, आम्ही वाटेल ते करू शकतो.
- किरण पावसकर, प्रवक्ते, शिंदे गट
जो हिंसकपणा यांच्यात आला हे अतिशय कमजोर व्यक्तीचे लक्षण आहे. सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपला आहे, आपण काहीही केले तरी आपल्याला कुणी काहीही करू शकत नाही, ही सत्तेची विकृती यांच्यात आलेली आहे. सरकार कायद्यानुसार चालते, कुणाचेही राज्य आले तरी सगळे कायद्याच्या चौकटीत केले पाहिजे. हेच या गटाचे आमदार विसरले आहेत. स्वत:च्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी राजकारणात असलेली ही लोकं आहेत. गोळी चालवणे, अधिकाऱ्यांना मारणे, शिवीगाळ करणे हे कमजोर मनोवृत्तीचे लक्षण आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे यांची ही शेवटची टर्म आहे, यानंतर महाराष्ट्राची जनता या गद्दारांना महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात स्थान देणार नाही, हे पक्के आहे. हे हिंदुत्वाच्या नावाने आले, सत्तेची विकृती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पन्नास खोके, एकदम ओक्के, सगळेच बोके हे लोकांमध्ये गेले. त्यावर रवी राणा- बच्चू कडू प्रकरणाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यांना लोकांशी, लोकांच्या प्रश्नांशी काही घेणे- देणे नाही. हिंदुत्व फक्त नावापुरते आहे, व्यक्तिगत सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र वेठीस धरण्याचे काम यांनी केलेले आहे. शेतकरी अडचणीत असताना हे त्यांच्या बांधावर गेले नाहीत. कोविड संपलेला आहे, आता नोकरभरतीबाबत यांच्यातील एकही आमदार आग्रही दिसत नाही. १२६ टक्के पाऊस पडल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करायला हे तयार नाहीत.
- अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस