चर्चेतील चेहरा की धक्कातंत्र? भाजपकडून कुणाला दिली जाणार स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी? आज ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 07:01 IST2026-02-18T07:01:17+5:302026-02-18T07:01:48+5:30
महापालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळणार आहे. या समितीचे महत्त्व लक्षात घेता या पदाच्या स्पर्धेत असलेल्या मातब्बर नगरसेवकांचे निवडीकडे लक्ष लागले आहे.

चर्चेतील चेहरा की धक्कातंत्र? भाजपकडून कुणाला दिली जाणार स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी? आज ठरणार
मुंबई : मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून मातब्बरांची नावे चर्चेत असल्याने निवड करताना भाजप श्रेष्ठींची कसोटी लागण्याची शक्यता आहे. मात्र, धक्कातंत्रात माहीर असणाऱ्या भाजपकडून चर्चेत असलेल्या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य नावाचीही निवड होऊ शकते. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचा चेहरा कोण असेल, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळणार आहे. या समितीचे महत्त्व लक्षात घेता या पदाच्या स्पर्धेत असलेल्या मातब्बर नगरसेवकांचे निवडीकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी उद्या बुधवारी पक्षातर्फे जो कोणी अर्ज भरेल त्यानंतर ही उत्सुकता संपुष्टात येईल. मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे ही मुख्य नावे चर्चेत आहेत.
भांदिर्गे यांचीही चर्चा
तिसऱ्यांदा नगरसेवकपद भूषविणारे हरिष भांदिर्गे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. ते २०१२ पासून नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये ते स्थायी समितीत सदस्यही होते.
स्थायी समिती सदस्यपदासाठी भाजपकडून नार्वेकर, दरकेर, शिंदे, भांदिर्गे यांच्यासह शीतल गंभीर, प्रीती सातम, तेजिंदर तिवाना यांचीही नावे जाहीर झाली आहेत.
शिंदेंचा ‘मूळ पक्ष’ ठरणार अडथळा?
महापौर रितू तावडे याही मूळच्या काँग्रेसच्या. मात्र, त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडल्याने भाजपमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर होता. परंतु, कोणीही उघड नाराजी व्यक्त केली नव्हती. त्यामुळे शिंदे यांचा ‘मूळ पक्ष’ हा त्यांच्यासाठी अडथळा ठरणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर,प्रभाकर शिंदे मुख्य दावेदार
महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना मकरंद नार्वेकर हे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. विविध प्रश्नांना त्यांनी हात घातला होता. ते प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत होते. ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबात आणखीही काही सदस्य नगरसेवकपद भूषवत आहेत. नार्वेकर कुटुंबात अनेकांना पदे मिळाल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या रूपाने आणखी एक पद या कुटुंबात देऊ नये असा सूर भाजप नगरसेवकांमध्येच आहे.
प्रकाश दरेकर हे भाजपमधील वजनदार नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत. ते स्वतः सहकार चळवळीत कार्यरत आहेत. ते मुंबई बँक आणि रायगड बँकेचे संचालक होते. मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते भाजपचे मुंबई उपाध्यक्ष असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले.
प्रभाकर शिंदे हे मूळचे एकसंध शिवसेनेचे. त्यावेळी त्यांनी महापालिका सभागृह नेता म्हणून काम पाहिले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते मूळचे भाजपचे नसल्याने त्यांच्या नावाचा विचार होईल का, याकडे भाजपच्या वर्तुळात लक्ष लागले आहे.