'आय विटनेस'मधून राजकारणातील अनेक गोष्टी उघड; केंद्रीय कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरींचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:21 IST2025-12-14T08:20:33+5:302025-12-14T08:21:06+5:30
शाहिद सिद्दीकी यांचे अनेक पंतप्रधानांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, असे असूनही त्यांनी पुस्तकात अनेक गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत.

'आय विटनेस'मधून राजकारणातील अनेक गोष्टी उघड; केंद्रीय कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरींचे प्रतिपादन
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दिकी यांच्या 'आय विटनेस' या पुस्तकाद्वारे भारतीय राजकारणातील अनेक अप्रकाशित गोष्टी समोर आल्या आहेत. राजकारण समजून घेण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी शनिवारी केले.
ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दिकी लिखित 'आय विटनेस' या पुस्तकाचे प्रकाशन इस्लाम जिमखान्यामध्ये झाले. यावेळी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खा. कुमार केतकर, जफर सरेशवाला, अतुल तिवारी, आसिफ फारुकी, मोहम्मद वजीहुद्दीन उपस्थित होते. 'सिद्दिकी यांनी आपल्या आठवणींतून अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे अनुभव कथन केले आहेत. अशा बार्बीचे पुस्तकाच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण होणे आवश्यक होते' असेही चौधरी यांनी नमूद केले.
शाहिद सिद्दीकी यांचे अनेक पंतप्रधानांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र, असे असूनही त्यांनी पुस्तकात अनेक गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत.
हे लिखाण करण्यासाठी मोठे धैर्य लागते, असे मत केतकर यांनी मांडले. घटना समाजासमोर कधीच आल्या नसत्या, अशा अनेक घटनांचे वर्णन पुस्तकात आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
आठवणींचे भांडार
महेश भट म्हणाले, हे पुस्तक महत्त्वाच्या आठवणींचे भांडार आहे. साक्षीदार धोकादायक असतो. त्याला खरेदी केले जाऊ शकत नाही, बाजू बदलता येत नाही. सिद्दिकी हे नेहरू ते मोदी यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार ठरले आहेत.
'सत्याची बाजू सोडली नाही'
पत्रकारिता करताना कोणतीही किंमत चुकवावी लागली तरीही साक्ष बदलू नये, या वडिलांच्या शिकवणीप्रमाणे काम केले. कधीही सत्याची बाजू सोडली नाही. त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली, असे शाहिद सिद्दिकी म्हणाले.