वनजमिनीच्या बहाण्याने घातला ८० लाखांना गंडा, तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:19 IST2024-05-20T15:19:38+5:302024-05-20T15:19:53+5:30
कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे याच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

वनजमिनीच्या बहाण्याने घातला ८० लाखांना गंडा, तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा
नवी मुंबई : वनविभागाची पडीक ५०० एकर जमीन नावावर करून देतो, असे सांगून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. स्वतःला सीबीआयचा कर्मचारी सांगणाऱ्या व्यक्तीने कोल्हापूरच्या ठेकेदारासह त्याच्या मित्राची ८० लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्याचा कळंबोली येथे कार्गो ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, त्यातून कोरेगावच्या सुनील धुमाळ याच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या धुमाळ याने तो सीबीआयमध्ये कॉन्स्टेबल चालक असल्याचे सांगितले. तसेच लाल दिव्याची गाडी घेऊनच तो अनेकदा त्यांच्या भेटीला येत असे. यादरम्यान त्याने ७० ते ८० लाखांत वनविभागाची जमीन नावावर करून मिळेल, असे घोरपडे याला सांगितले.
कोर्टासह वनविभागाच्या बनावट पत्रांचा वापर
धुमाळ याने त्याला भारत सरकारची जमीन हस्तांतरणाचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाच्या आदेशाचे पत्रही दिले होते; परंतु जमीन हस्तांतरणाचा अंतिम आदेश देण्यात उशीर होऊ लागल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. त्यामध्ये कोर्ट आदेश, भारत सरकारचे पत्र बनावट असल्याचे समोर आले.
त्यानंतरही तो घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशी केली असता त्याचे वापरलेले ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.