मुंबई : 'ड्रग्ज इन पार्सल' प्रकरणात एका वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ७१.२४ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे गोरेगावचे आहेत. त्यांना २४ सप्टेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. कॉलरने तो दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे भासवले. तुमचे पार्सल येथे आले असून त्यामध्ये १६ पासपोर्ट, ५८ एटीएम, १८० ग्रॅम एमडीएम सापडल्याचे सांगितले. त्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि नाव नमूद असल्याचेही तो म्हणाला. नंतर त्याने दिल्ली पोलिस ठाणे क्राइम ब्रँच अधिकारी म्हणणाऱ्या सुनील कुमार याला कॉल जोडून दिला.
त्याने तक्रारदाराची वैयक्तिक माहिती विचारली, तसेच त्यांना व्हिडीओ कॉल करत त्यांच्या हातात आधारकार्ड धरून त्याचा मागे-पुढे फोटो काढला आणि त्यांना तो फोटो पाठवायला सांगितला, तसेच तक्रारदाराचे व्हिडीओ स्टेटमेंट घ्यायची असल्याचे सांगत एकटेच एका रूममध्ये राहायला सांगितले. व्हिडीओ कॉल सुरू असतानाच तक्रारदाराचे पोलिस रेकॉर्ड विचारले. यावेळी संजय सिंग नावाने गुन्हा दाखल असून, त्यामध्ये तक्रारदाराच्या आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगितले.
... बँक खात्याची तपासणी करावी लागेल
तक्रारदाराला आरोपींनी अरेस्ट वॉरंट व्हॉट्सअॅप करत त्यांना डिजिटल अटक झाल्याची भीती घातली. त्यांना एक खोलीत स्वतःला बंद करून घेण्यास सांगत कुठेही बाहेर जाऊ नका, असे बजावले.
■ याबाबत कुटुंबाकडेही वाच्यता करू नका, अन्यथा जिवाला धोका निर्माण होईल, असे सांगितले. बाहेर जायचे असल्यास बँक खात्याची पडताळणी करावी लागेल असे सांगत ७१ लाख २४ हजार रुपये त्यांना पाठवायला सांगितले. • पैसे पाठविल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.