Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावरील कंत्राटी कामगारांची पिळवणूक, वेळेवर वेतन नाही, कमी वेतनामुळे कर्मचारी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 18:54 IST

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमानतळावरील कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून कामगारांची पिळवणूक सुरु आहे.

 

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमानतळावरील कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून कामगारांची पिळवणूक सुरु आहे. वेळेवर वेतन न देणे, जास्त काम करायला लावून कमी वेतनात बोळवण करणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.  या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र लढा  देण्याचा इशारा मनसे हवाई कर्मचारी सेना व फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनने दिला आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व देशांतर्गत विमानतळावर हजारो कर्मचारी कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. लॉकडाऊन कालावधीत त्यांना कामावर येण्यास भाग पाडण्यात आले. खासगी वाहन, दुचाकीने कामावर आल्यावर इंधन खर्च देण्याचे आश्वासन देण्यात आले होते प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वेतनात देखील कपात करण्यात आली असून पूर्ण वेतन देण्यास टाळाटाऴ करण्यात येत आहे.

याबाबत मनसे हवाई कर्मचारी सेनेचे अध्यक्ष नितीन सरदेसाई यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांना पत्र लिहून त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या उप कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल, मे  या महिन्यांचा पूर्ण वेतन दिलेले नाही. या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विमानतळावर कार्यरत असताना कोरोनाची लागण झाली त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत किंवा विम्याची सुविधा देण्यात आलेली नाही याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

याबाबत मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी  म्हणाले,  अनेक कंत्राटी कामगारांचे कामाचे कंत्राट मार्च महिन्यात संपुष्टात आले होते. त्याचा कंत्राटदारांना लाभ झला मात्र कर्मचारी त्यामुळे त्रस्त झाले. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. सरचिटणीस विलास चव्हाण व उपाध्यक्ष दिपक गायकवाड  यांनी ही परिस्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा  इशारा दिला आहे. 

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांनी याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ च्या प्रशासनाला पत्र लिहून विमानतळावरील कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरुन काढू नये, कुणाचेही वेतन कमी करु नये,  कंत्राटी कामगारांना पूर्ण वेतन द्यावे अशा मागण्या केल्या होत्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांची होत असलेला पिळवणूक समाप्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :विमानतळकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई