सायन स्टेशनपर्यंत पॉड टॅक्सीचा विस्तार;एमएमआरडीएपडून दुसऱ्या टप्प्याबाबत विचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:21 IST2024-12-04T10:54:27+5:302024-12-04T11:21:36+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विचार सुरू आहे.

सायन स्टेशनपर्यंत पॉड टॅक्सीचा विस्तार;एमएमआरडीएपडून दुसऱ्या टप्प्याबाबत विचार सुरू
मुंबई : कुर्ला - बीकेसी - वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात सायन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विचार सुरू आहे.
एमएमआरडीएकडून पॉड टॅक्सी प्रकल्पाची सार्वजनिक - खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी हैदराबाद येथील साई ग्रीन मोबिलिटी या कंपनीला १ हजार १६ कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले आहे. त्यातून वांद्रे ते कुर्ला या मार्गावर २०२७ मध्ये पॉड टॅक्सी धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आता एमएमआरडीएकडून दुसऱ्या टप्प्यात पॉड टॅक्सीचा सायन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. हा मार्ग धारावीतून जाणार आहे. धारावीचा पुनर्विकास होऊ घातला आहे. त्यानंतर या भागात नव्या वाहतूक व्यवस्थेची गरज पडणार असून, त्या अनुषंगाने एमएमआरडीएकडून या नव्या पर्यायाचा विचार केला जात आहे.
२०३१ पर्यंत उभारणार
पॉड टॅक्सीचा मार्ग २०३१ पर्यंत उभारण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी ८.८ किमी आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील मार्ग मिळून मुंबईत पॉड टॅक्सी सेवेचा एकूण १३.५ किमी लांबीचा मार्ग तयार होणार आहे.
प्रकल्पावर दृष्टीक्षेप
पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी - ८.८ किमी. मार्ग - कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक. स्थानके - ३८ पॉड टॅक्सीचा वेग - ४० किमी प्रतितास प्रवासी क्षमता - ६ प्रवासी प्रति किमी दर - २१ रुपये
...असा आहे पहिल्या टप्प्यातील मार्ग
कुर्ला रेल्वे स्टेशन, भाभा हॉस्पिटल, एलबीएस रोड, यूएस कॉन्सुलेट, ट्रायडेंट हॉटेल, रिजनल पासपोर्ट ऑफिस, एमसीए स्टेडियम, डायमंड बोर्स, जिओ वर्ल्ड सेंटर, सेबी भवन, आयएल अँड एफएस, एनएसई, एसबीआय, जीएसटी बिल्डिंग, एमएमआरडीए, फॅमिली कोर्ट, वांद्रे रेल्वे स्टेशन.
दुसऱ्या टप्प्यातील १६ स्थानकांचा मार्ग
न्यू मिल रोड, ईक्चिनॉक्स, टॅक्सीमेन कॉलनी, एमटीएनएल, सीबीआय हेडक्वॉर्टर, अंबानी स्कूल, बीकेसी फायर स्टेशन, एमएमआरडीए मैदान, एशियन हार्ट हॉस्पिटल, धारावी डेपो, सायन रेल्वे स्टेशन.