दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:56 IST2025-11-11T07:56:01+5:302025-11-11T07:56:41+5:30
Alert in Mumbai: दिल्लीतील स्फोटानंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खबरदारी म्हणून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्र कृती दल, फोर्सवन यंत्रणा महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.

दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
मुंबई - दिल्लीतील स्फोटानंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खबरदारी म्हणून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्र कृती दल, फोर्सवन यंत्रणा महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे. मंत्रालयासह शासकीय मुख्यालये, नेत्यांची निवासस्थाने, अन्य महत्त्वाची शासकीय ठिकाणे यासोबतच, गजबजलेल्या बाजारपेठा, धार्मिक स्थळे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सायबर पोलिस सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
रेल्वे स्थानकांवर खडा पहारा!
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. श्वानपथक आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी रेल्वे स्थानकांवर संशयास्पद वस्तूंची तपासणी सुरू केली. याचबरोबर प्रवाशांनी जागरूकतेने प्रवास करावा, अनोळखी वस्तूंना स्पर्श टाळावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
आयुक्त देवेन भारती यांनी बैठक बोलावून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले. या बैठकीत सह आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, सह आयुक्त(गुन्हे) लखमी गौतम, सह आयुक्त(प्रशासन) जय कुमार उपस्थित होते. या बैठकीनंतर शहरातील संवेदनशील शासकीय, खासगी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.