मुंबईत सध्या वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. अगदी दुपार उजाडली तरी उंच इमारती वायू प्रदूषणात हरवून गेलेल्या पाहायला मिळतात. गेल्या तीन दिवसातील प्रदूषणाची आकडेवारी पाहिली तर तीही चिंताजनक अशीच आहे. शुक्रवारी २० डिसेंबर रोजी एअर क्वालिटी इंडेक्स १८७ वर पोहोचला होता. शनिवारी एअर क्वालिटी इंडेक्स १८२ इतका होता. तर रविवारी हा आकडा वाढून थेट २२८ वर पोहोचला. हा आकडा नक्कीच मुंबईसाठी काही चांगला नाही. मुंबईत वरळी, कुलाबा भागात सर्वाधिक प्रदूषण आढळून येत आहे. या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्या संबंधीच्या तक्रारींमध्येही वाढ होतेय. सर्दी, खोकला, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये वाढ झालीय. देशाची राजधानी दिल्ली हवा प्रदूषणाशी झुंजत असताना मुंबईचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. यामागची नेमकी कारण काय आहेत.
१. कमी आर्द्रता आणि वाऱ्याचा उभा वाढता वेगदरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते. हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. यामुळे धुरके म्हणजे हवेच्या प्रदुषणात वाढ होते. याच काळात वाऱ्याचा उभा वाढता वेग देखील दृश्यमानता कमी होण्यास हातभार लावणारा ठरतो. या नैसर्गिक कारणासोबतच मानवनिर्मित कारणं देखील प्रदूषण वाढीत मोठी भर घालतात.
२. वाढतं बांधकाम आणि वाहनांचं प्रदूषणपायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. मुंबईत हिवाळ्याच्या काळात बांधकांच्या ठिकाणांहून उडणारी धूळ बरचा काळ हवेत टिकून राहते. यामुळे या काळात मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी काही निर्बंध घालणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
३. अचूक AQI चा अभावहवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती यावर हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित होतो. धुलीकणांचे मोजमाप हे प्रति घनमीटर क्षेत्रात किती धुलीकण आहेत त्यानुसार केले जाते. तसेच धुलीकणाचे आकारमान पीएम २.५ आणि पीएम १० अशा प्रमाणात निश्चित होते. अतिसूक्ष्म धुलीकण म्हणजे पीएम २.५ हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ असून या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. पीएम २ पूर्णांक ५ ची मात्रा जास्त असते तेव्हा धुरक्याचे किंवा धुलीकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते. अतिसूक्ष्म धुलीकणापेक्षा किंचित मोठा म्हणता येईल असा पण १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या धुलीकणाला पीएम १० म्हटले जाते. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता ठरते. ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो. शहर धुरक्यात हरवलेलं असताना मुंबईतील एकूण हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत गेला आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील अनेक रेकॉर्डिंग स्टेशन्स हिरव्यागार भागात आणि बागांमध्ये बसवलेली आहेत, त्यामुळे ही स्टेशन्स मुंबईच्या एकूण हवेच्या गुणवत्तेचे अचूक चित्र प्रदान करण्यात अयशस्वी ठरतात. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हवेच्या गुणवत्तेचे स्टेशन वेगवेगळ्या सूक्ष्म वातावरणात समान रीतीने वितरीत केले पाहिजेत ज्यात रहदारी जंक्शन्स, डाउनटाउन, निवासी, औद्योगिक क्षेत्र इत्यादींचा समावेश असावा. मुंबई हे एक त्या चार शहरांपैकी एक आहे जेथे Early Warning System अस्तित्वात आहे. पण SAFAR-मोबाइल ॲप कार्यान्वित नसल्यामुळे, AQI मध्ये SAFAR चे रिडिंग समाविष्ट आहे की नाही किंवा निवडक स्टेशन्सच्या सरासरीवरच AQI आधारित आहे याची स्पष्टता नाही.
मुंबईकरांनी कोणती काळजी घ्यावी? प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची अॅलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे असेही आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणं टाळावं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. थंड पेये, तेलकट खाणे टाळावं. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना मास्क वापरणं उत्तम असे सल्ले तज्ज्ञांनी दिले आहेत.