Join us  

विमानात दिले मुदतबाह्य मिल्क शेक; प्रवासी आजारी, स्पाइसजेटला दंड; ३२ लाखांची मागितली नुकसान भरपाई, मिळाले ६० हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 9:55 AM

संबंधित व्यक्ती ही बंगळुरूची रहिवासी आहे. त्याने तेथील न्यायालयात विमान कंपनीविरोधात दाद मागितली होती. 

मुंबई  : दुबईतून मुंबईत येणाऱ्या एका प्रवाशाला मुदत संपलेला मिल्क शेक दिल्याने तो आजारी पडल्यामुळे स्पाइसजेट कंपनीला बंगळुरू येथील न्यायालयाने ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित व्यक्ती ही बंगळुरूची रहिवासी आहे. त्याने तेथील न्यायालयात विमान कंपनीविरोधात दाद मागितली होती. 

प्राप्त माहितीनुसार, ही घटना गेल्यावर्षी २० जून रोजी घडली होती. संबंधित व्यक्ती ज्यावेळी स्पाइसजेटच्या विमानाने दुबईतून मुंबईत येत होती, त्यावेळी प्रवासादरम्यान त्याने मिल्क शेक ऑर्डर केला होता. त्याला ८० मिलीचे एक पाकीट विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्याने तो मिल्क शेक प्यायला व त्यानंतर ते पाकीट सहज तपासले असता त्या मिल्क शेकची मुदत संपल्याचे त्याला आढळून आले. तसेच, त्यानंतर त्याला त्याचा शारीरिक त्रासही झाला. हा मिल्क शेक प्राशन केल्यामुळे ती व्यक्ती काही दिवस आजारी पडली. या आजारपणामुळे आपले व्यावसायिक नुकसान झाल्याचा दावा करत व आपल्या आजारपणाची सर्व माहिती देत त्याने न्यायालयात  स्पाइसजेटविरोधात दाद मागितली होती. 

या व्यक्तीने व्यावसायिक नुकसानापोटी २२ लाख रुपये, वैद्यकीय खर्चापोटी ९ लाख रुपये, यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे एक लाख रुपये व प्रवास खर्चाचे ५० हजार रुपये अशी एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांच्या लाख रुपच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र, अलीकडेच याप्रकरणी न्यायालयाने निर्णय देत कंपनीला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

टॅग्स :स्पाइस जेटविमान