Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकतो, पण घातक ठरतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:19 IST

आंबा पिकवण्यासाठी रसायनांच्या वापरामुळे तज्ज्ञांकडून खवय्यांना काळजी घेण्याची सूचना

मुंबई : उन्हाळा ऋतू नकोनकोसा वाटत असला, तरी केवळ कैरी-आंबे खायला मिळणार, म्हणून सर्वजण या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. आंबे खायला आवडत नाही, अशी मंडळी फार क्वचितच पाहायला मिळतील. मात्र, आता सुरुवातीच्या काळात नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा बाजारात सहसा येत नाही, म्हणून आंब्याला पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. या घातक रसायनांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बाजारात पदार्पण केल्यानंतर सर्वांनाच आंब्याची चव चाखण्याची घाई लागलेली असते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून आंब्याचे अव्वाच्या सव्वा दर लावले जातात. तसेच, व्यापारी घातक रसायनांनी कच्चे फळ पिकवून ग्राहकांच्या माथी मारतात. काही रुपयांच्या फायद्यासाठी व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी खेळतात.

सध्या बाजारात हापूस आंबे प्रति डझन २५००, ३००० रुपये आणि त्यापेक्षा अधिक दराने विकले जात आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आंब्याचे भाव कमी होतात. मात्र, आता बाजारात नव्या आंब्यासाठी ग्राहकांना खिसे खाली करावे लागत आहे.

अलिकडेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्राच्या चालकांना फळे कृत्रिमरीत्या पिकविण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले होते.

तसेच, आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शिअम कार्बाइडच्या पावडरच्या वापराबाबतही सूचना जारी केला होता. तरीही काही व्यापारी आजही आंबा पिकविण्यासाठी आरोग्यास हानीकारक असलेल्या रसायनांचा वापर करतात. त्यामुळे लोकांच्या आरोग्यास गंभीर स्वरूपात आपाय होऊ शकतो.

कार्बाइडयुक्त आंबा कसा ओळखावा ? 

तज्ज्ञांनुसार नैसगिकपणे पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकलेल्या आंब्यावर काळे डाग जास्त असतात, व सुगंधही तीव्र असतो. 

जर आंब्याचा रंग गडद पिवळा असेल; तर असे आंबे खरेदी करणे टाळायला हवे. खरेदी केल्यानंतर आंबे काही दिवसांत खराब होत असतील, तर फळ पिकविण्यासाठी रसायनाचा वापर झाला आहे, असे समजा.

प्रक्रियेतून हानिकारक घटकांचे उत्सर्जन

आंब्यासह काही अन्य फळेही कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवली जातात. त्यामुळे वातावरणात हानिकारक वायू, तसेच, आरोग्यास अपायकारक आर्सेनिक आणि फॉस्फरसही उत्सर्जित होतात.

रसायनाने कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ?

आंब्यासह काही अन्य फळेही कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवली जातात.

त्यामुळे वातावरणात हानिकारक वायू उत्सर्जित होतो. तसेच, यामध्ये आरोग्यास अपायकारक असणारे आर्सेनिक आणि फॉस्फरसही उत्सर्जित होतात.

चक्कर, चिडचिड, वारंवार तहान लागणे, अशक्तपणा, गिळताना त्रास होणे, उलट्या, त्वचेवर पुरळ, यासारख्या गंभीर समस्यांचा सामनाही त्यांना करावा लागतो.

आता आंबा अत्यंत महाग आहे. तरी, बाजारात मागणी जास्त आहे. अनेक जातीचे आंबे येतील. आणखी मागणी वाढेल. त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंत बाजारात आंब्याची चलती असेल - रणजीत यादव, फळ व्यापारी

टॅग्स :कोकणआंबा