Join us  

काँग्रेसचा मुंबईतही अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:08 AM

अध्यक्षपदाचा तिढा कायम : काँग्रेस श्रेष्ठी संभ्रमात तर कार्यकर्ते अनभिज्ञ

मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असल्या तरी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा देताना सामूहिक नेतृत्वाचा प्रस्ताव मांडला होता. तर, देवरा यांच्यापूर्वी अध्यक्ष पदावर असणाऱ्या संजय निरुपम यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने एक अध्यक्ष आणि पाच कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले तसाच प्रयोग मुंबईत केला जाण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून वर्तविली जात आहे. परिणामी, मुंबई अध्यक्ष पदावरून पक्षातील श्रेष्ठीच गोंधळात असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. एकट्या मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. एकीकडे भाजप-शिवसेनेकडून मुंबईतील सर्व जागा जिंकण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असताना मुंबई काँग्रेस मात्र निर्णायकी अवस्थेत आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाल्याने पक्ष म्हणून कोणताच कार्यक्रम सध्या काँग्रेसकडून सुरू नाही. दरम्यानच्या काळात डोंगरी इमारत दुर्घटना, मालाड येथे भिंत कोसळून झालेला अपघात, गोरेगाव येथे दीड वर्षाचा मुलगा मॅनहोलमध्ये वाहून जाणे, वांद्रे येथे एमटीएनएलच्या इमारतीला लागलेली आग असे प्रश्न चर्चेत आले. शिवाय, पाऊस आणि खड्ड्यांचा प्रश्नही आहेच. या सर्व प्रश्नांवर काँग्रेसकडून परिणामकारक आंदोलन, मोर्चे होत असल्याचे दिसत नाही. निवडक नेत्यांचे ट्विटवरील आरोप वगळता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रभावी विरोधाची भूमिका बजावली जात असल्याचे दिसत नाही. विरोधकांना वातावरण तापविण्यासाठी इतके मुद्दे उपलब्ध असताना मुंबईतील काँग्रेस नेते मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

एकीकडे पक्षाच्या निर्णायकी अवस्थेमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते दिशाहिन झालेले असताना पक्षश्रेष्ठीसुद्धा मुंबईतील गटबाजीसमोर हतबल असल्याचे चित्र आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर कोणा एकाकडे अध्यक्षपद द्यायचे तर सक्षम नावावर एकमत होत नाही. सामूहिक नेतृत्वाच्या प्रयोगाबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने एक अध्यक्ष आणि पाच कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले; तसाच प्रयोग मुंबईत केला जाण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून वर्तविली जात आहे. देवरा यांना मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवायचे. त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष देण्याबाबत पक्षात गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यासाठी एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे. प्रदेश स्तरावरील कार्याध्यक्षांची नियुक्ती करताना जातीय समीकरणे सांभाळण्यात आली. त्याच धर्तीवर मुंबईतही कार्याध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दलवाई आणि गायकवाड यांच्या नियुक्तीने वंचित आघाडी आणि एमआयएम फॅक्टरलाही थोपविता येईल, असा तर्क मांडला जात आहे.

आमदारांच्या संख्येबाबत पक्षात चर्चालोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच संजय निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करीत मिलिंद देवरा यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. या नेतृत्व बदलानंतरही मुंबईतील निकाल युतीच्याच बाजूने गेले. आता विधानसभांची रणधुमाळी सुरू असताना देवरा यांनीही सामूहिक नेतृत्वाची भलामण करीत मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी राष्ट्रीय जबाबदारी घेण्याचीही तयारी दर्शवली. लोकसभेप्रमाणे विधानसभा रणसंग्रामाच्या तोंडावर नेतृत्वाचा प्रश्न चिघळल्याने सध्या ३६ पैकी पाच आमदारांची संख्या तरी राखता येईल का, याची चर्चा खुद्द पक्षातच सुरू आहे.

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपम