मुंबई महापालिका निवडणूक : स्वतंत्र खात्यातून प्रचारफेऱ्या, सभांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:21 IST2026-01-02T11:20:27+5:302026-01-02T11:21:00+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथक गठित करण्यात आले आहे...

मुंबई महापालिका निवडणूक : स्वतंत्र खात्यातून प्रचारफेऱ्या, सभांचा खर्च
मुंबई : उमेदवारांनी अर्ज सादर केल्याच्या दिवसापासून दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालिकेकडून दरसूची ही निश्चित केली आहे तसेच उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बॅंक खात्यातून करणे आवश्यक असल्याची माहिती करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथक गठित करण्यात आले आहे. याच्या आढावा बैठकीत बेल्लाळे यांनी सूचना व आवश्यक माहिती पथकातील अधिकाऱ्यांना दिली. उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवणे, खर्चाच्या मर्यादांचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी करणे, तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीची सूचना दिल्या तसेच खर्च निरीक्षक, लेखा पथके, भरारी पथके व व्हिडिओ पाळत पथकांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला.
मार्गदर्शक पद्धती निश्चित
राज्य निवडणूक आयॊगाकडून उमेदवारांच्या खर्चाबाबतच्या मार्गदर्शक पद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी मिळणारा निधी, देणग्यांचा तपशील आणि केलेला खर्च यांची माहिती निकाल लागल्यापासून ३० दिवसांत प्रतिज्ञापत्रासह सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून प्रचाराकरीता वापरल्या जाणाऱ्या प्रचार साहित्यासाठी स्थानिक दरांनुसार दरसूची तयार करण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केल्यानंतर उमेदवार आणि संबंधित कार्यालयाने ही कागदपत्रे व्यवस्थित जतन करणे आवश्यक आहे.