मतदानावेळी 'महा' गोंधळ : बोटावरची शाई पुसली गेल्याच्या तक्रारींमुळे वाद, काही ठिकाणी ईव्हीएमवरून वाद, तर काही ठिकाणी मारहाण
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल गुरुवारी 'ईव्हीएम'बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला शुक्रवारी सकाळी १० पासून सुरू होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे.
मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता असून एक्झिट पोलमध्ये मात्र भाजप-शिंदेसेना महायुती बाजी मारेल असे दिसते.
वाद टाळण्यासाठी आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले
राज्यातील २९ महापालिकांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.१३% मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरची मतदानाची टक्केवारी जाहीर करणे आयोगाने टाळले आहे. टक्केवारीवरून होणारे वाद टाळण्यासाठी आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंदाजित टक्केवारीही जाहीर केली नाही.
महापालिकांवर कुणाची सत्ता? निकालात ठरणार...
पुणे, मराठवाड्याचे केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगरचा कौल कोणाला?
द्राक्षनगरी नाशिकची द्राक्षे कोणासाठी आंबट ठरतील आणि कोणासाठी गोड याबद्दल अनेकांची धाकधूक वाढली आहे.
नांदेडचे किंग अशोक चव्हाणच? की काँग्रेसचा राहणार वरचष्मा?
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आणखीच आधुनिकतेकडे झेपावलेल्या नवी मुंबईत सत्तापक्षातीलच एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या वादात मतदार कोणाला साथ देणार?
कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद महायुतीला की महाविकास आघाडीला ?
अंतर्गत गटबाजीने भाजप जेथे ग्रस्त आहे त्या चंद्रपूरने भाजपला तारले की काँग्रेसला?
मुंबई महानगरपालिका
ठाकरे बंधूंची जादू चालली नसल्याचे संकेत
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना महायुती उद्धव आणि राज या ठाकरे बंधुंना धक्का देतील, असे मतदानानंतर जाहीर झालेल्या पाच एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. पाचही एक्झिट पोल महायुतीला १२१ पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे दाखवत आहेत. तर दुसरीकडे तब्बल १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही मागील निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या ८४ जागाही राखताना दिसत नाहीत. मराठीचा मुद्दा दोन्ही ठाकरे बंधुंनी या निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने उचलला होता. परंतु, त्याचा फारसा प्रभाव निकालावर दिसणार नाही, असे संकेत एक्झिट पोलचे हे आकडे देत आहेत. हा ठाकरे बंधूंना मोठा फटका असल्याचे एक्झिट पोलमधून दिसते. त्याचवेळी काँग्रेसच्याही जागा मागील निवडणुकीपेक्षा निम्म्याही येताना दिसत नाहीत.
पुणे भाजपच शिलेदार; पवारांना फटका
पुणे महापालिकेत यावेळी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यांचा तितकासा प्रभाव पडणार नाही, भाजपच आपली सत्ता कायम राखेल, असे एक्झिट पोलचे हे आकडे सांगतात.
पिंपरी चिंचवड अजित पवारांना भाजप पुन्हा देणार धक्का
पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यापासून अजित पवारांच्या ताब्यात होती. मात्र २०१७ च्या निवडणुकीत भाजपने अजित पवारांना धक्का देत इथली सत्ता खेचून आणली होती. एक्झिट पोलनुसार भाजप यावेळी पुन्हा सत्ता राखणार असे दिसते. मात्र भाजपच्या काही जागा मागच्या वेळेपेक्षा कमी होताना दिसतायत. तर अजित पवार यांच्या काही जागा वाढताना दिसत आहेत. एक्झिट पोलनुसार सत्ता मात्र भाजपचीच येईल, असे दिसते.
नागपूर
भाजप राखणार आपला गड
नागपूरमध्ये भाजप गड राखेल असा एक्झिट पोलमध्ये कौल दिसतो. सर्वाधिक जागा त्याही १०० च्या वर घेत भाजप आपली ताकद पुन्हा सिद्ध करेल. काँग्रेस थोडीशी जोर मारेल असे दिसते.
नाशिक
शिंदे-पवारांवर भाजप भारी
नाशिकमध्ये शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केली असली तरी तिथे भाजप सत्ता स्थापन करेल असे एक्झिट पोलवरुन दिसते.
ठाणे
शिंदेसेना आपला किल्ला राखणार
ठाण्यात भाजपने जोर लावला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचीच सत्ता असेल असे दिसते. उद्धवसेनेला लोकांचा प्रतिसाद नसल्याचे दिसते.