EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर

By मोरेश्वर येरम | Updated: June 14, 2025 15:27 IST2025-06-14T15:22:21+5:302025-06-14T15:27:07+5:30

'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली.  ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे. 

exclusive coastal road walkway review with mumbai municipal commissioner bhushan gagrani | EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर

EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर

मुंबई

मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. पण या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'कोस्टल वॉकवे' आहे. जो सर्वसामान्य मुंबईकरांना एक विरंगुळ्याचं ठिकाण उपलब्ध व्हावं या हेतूने तयार करण्यात आला आहे. या 'कोस्टल वॉकवे'चं काम आता पूर्णत्वास आलं असून ते आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. याच 'कोस्टल वॉकवे'ची खास सफर सर्वप्रथम 'लोकमत'वर पाहता येईल. 'लोकमत मुंबई'चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची यांच 'वॉक-वे'वर मुलाखत घेतली.  ज्यात गगराणी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली आहे. 

कोस्टल वॉकवे नेमका कुठून सुरू होतो? त्याची लांबी किती? या वॉकवेवर मुंबईकरांना काय-काय पाहायला मिळणार आहे, याची सर्व माहिती भूषण गगराणी यांनी या व्हिडिओ मुलाखतीच्या माध्यमातून दिली आहे.

कोस्टल वॉकवे नेमका कुठे?
मुंबई कोस्टल वॉकवेचा मुख्य उद्देश म्हणजे मुंबईकरांना एक सुंदर आणि निसर्गरम्य जागा उपलब्ध करून देणे आहे. ज्यात चालणे, जॉगिंग करणे किंवा सायकल चालवण्याचीही आनंद घेता येणार आहे. हा वॉकवे प्रियदर्शनी पार्क (Breach Candy) ते वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) पर्यंत असा एकूण ७.५ किमी लांबीचा आहे. या 'वॉकवे'च्या ठिकाणी येण्यासाठी कोस्टल रोड ओलांडण्याची वेळ मुंबईकरांवर येणार नाही. यासाठी कोस्टलरोडच्या खालून एकूण ११ ठिकाणी सब-वे तयार करण्यात आले आहेत. ज्या सबवेमधून सहज आणि सुरक्षितपणे वॉक-वेवर पोहोचता येणार आहे. याशिवाय वॉक-वेच्या लागूच मुख्य रस्त्यानजिक बेस्टच्या बसेस थांबण्यासाठीचे थांबे केले गेले आहेत. म्हणजेच बेस्ट बसमधूनही हे ठिकाण सहजपणे गाठता येणे शक्य आहे.

वैशिष्ट्य काय?
कोस्टल वॉकवे हा मरिन डाइव्हच्या किनाऱ्यासारखाच वरळीच्या किनारपट्टी भागात बनवण्यात आलेला सुंदर वॉक वे आहे. या वॉकवेवर मुंबईकरांना, पर्यटकांना समुद्र किनारी निवांत बसून दोन क्षण विरंगुळ्याचे व्यतित करता यावेत यासाठी आसन व्यवस्था आहे. तसंच या वॉकवेवर ठिकठिकाणी सुंदर वृक्षांची लागवड केली गेली आहे. तसंच बसण्यासाठीचे बेंचेस देखील अत्याधुनिक पद्धतीनं तयार केले आहेत. ज्यावर मुंबईकरांना बसून छान समुद्राची गाज ऐकत निवांत बसून गप्पा मारता येतील. संध्याकाळच्या वेळी या वॉकवेचं सौंदर्य आणखी वाढेल. कारण याठिकाणी उत्तम अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे. वॉकवेवर रोषणाईसाठी उभारण्यात आलेल्या लाइट पोलमध्येच एअर क्वालिटी कंट्रोल, सीसीटीव्ही आणि रंगबेरंगी रोषणाई असे फिचर्स आहेत. 

हेलिपॅडचा प्रस्ताव
कोस्टल वॉक-वेची सफर करत असतानाच भूषण गगराणी यांनी एक एक्स्लुझिव्ह माहिती 'लोकमत'च्या वाचकांना दिली आहे. "कोस्टल रोडचं काम सुरू असताना रेती-सिमेंट इत्यादी माल वाहून आणणं मोठं आव्हान होतं. त्यासाठी किनाऱ्याला लागूनच तात्पुरत्या स्वरुपाच्या दोन जेट्टी तयार करण्यात आल्या होत्या. त्यातील एक जेट्टी काम पूर्ण झाल्यानंतर तोडून टाकली गेली. पण दुसरी जेट्टी तशीच ठेवली आहे. या जेट्टीचं रुपांतर हेलिपॅडमध्ये करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारला पाठवला आहे", असं आयुक्त गगराणी यांनी सांगितलं. यावेळी ती जेट्टीची जागाही त्यांनी दाखवली. तसंच या हेलिपॅडचे फायदेही सांगितले. "हेलिपॅडच्या फायदा दक्षिण मुंबईतील व्हीआयपी वाहतुकीसाठी तर होईलच पण याचा सर्वात मोठा फायदा रुग्णांना होईल. एअर अॅम्ब्युलन्सनं रुग्णांना दक्षिण मुंबईतील रुग्णालयांमध्ये घेऊन येताना मुंबई विमानतळाहून खूप मोठा पल्ला इथे रस्ते वाहतुकीतून गाठवा लागतो. ज्यात ट्राफिकची समस्या असते. पण इथं दक्षिण मुंबईत असा समुद्र किनारी हेलिपॅड उपलब्ध झाला. तर इथल्या जवळपास १० ते १२ रुग्णालयांमध्ये रुग्ण अवघ्या काही मिनिटांत पोहचू शकतील", असं गगराणी यांनी सांगितलं.

Web Title: exclusive coastal road walkway review with mumbai municipal commissioner bhushan gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.