Exciting journey on the wall of China | मुंबईतून घेता येतोय चीनच्या भिंतीवरील चित्तथरारक प्रवासाचा अनुभव
मुंबईतून घेता येतोय चीनच्या भिंतीवरील चित्तथरारक प्रवासाचा अनुभव

मुंबई : उंचच उंच पर्वतरांगा, खोल खोल दऱ्या, कधी ओबडधोबड वाटा, अंगावरच येतो की काय असा लाल रंगाचा ड्रॅगन आणि पांढरा शुभ्र असा डोळ्यांना सुखद गारवा देणारा भलामोठा चांदोबा, असे सारे काही गतीच्या आभासी दुनियेतले चीनच्या भिंतीवरील चित्र आता मुंबईत अनुभवता येत आहे. मुंबईतल्या वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात नुकत्याच बसविण्यात आलेल्या ‘मोशन सिम्युलेटर’मुळे हे शक्य झाले आहे.

विद्यार्थी, पालकांसह प्रत्येकाला विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी, विज्ञानाचे प्रयोग पाहता, अनुभवता यावेत, विशेषत: हाताळता यावेत म्हणून नेहरू विज्ञान केंद्र सातत्याने प्रयत्नशील असते. अशाच काहीशा प्रयोगशील, कल्पकशील उपक्रमांचा भाग म्हणून नेहरू विज्ञान केंद्रात ‘मोशन सिम्युलेटर’ बसविण्यात आल्याची माहिती नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेणेद यांनी दिली. खेणेद म्हणाले की, विद्यार्थीवर्ग असो, पालक किंवा अन्य कोणीही. प्रत्येकाला चीनची भिंत प्रत्यक्षात पाहता येणे शक्य नसते. पण तीच गतीच्या आभासी दुनियेच्या माध्यमातून पाहता आली तर प्रत्येकालाच आवडेल. म्हणून केंद्राने हा उपक्रम, सुविधा हाती घेतली आहे. गतीच्या आभासी दुनियेच्या दहा फिल्म्स आमच्याकडे आहेत. मात्र त्या सर्व आम्हाला दाखविता येत नाहीत. कारण त्या दाखविण्यासाठीचे परवाने लागतात. आमच्याकडे सध्या एकाच फिल्मचा परवाना आहे. त्यानुसार ‘चायना वॉल’ची फिल्म गतीच्या आभासी दुनियेतून म्हणजेच ‘मोशन सिम्युलेट’द्वारे दाखविण्यात येत आहे. गंमत, कुतूहल हा गतीच्या आभासी दुनियेतला भाग असला तरी त्यासोबतच विज्ञानही जोडले गेले असून, याच माध्यमातून ‘मोशन सिम्युलेटर’चा प्रत्यक्ष आनंद बच्चेकंपनीला घेता येणार आहे.


नेहरू विज्ञान केंद्रातील ‘मोशन सिम्युलेटर’ सुरू करण्यात आले असले तरी त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. येत्या काही दिवसांतच त्याचे उद्घाटन केले जाईल, असे नेहरू विज्ञान केंद्राचे लायब्ररी अधिकारी एस.एम. बानी यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालत गतीच्या आभासी दुनियेचा अनुभव प्रत्येकाला या माध्यमातून घेता येईल, असेही बानी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Exciting journey on the wall of China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.