मुंबईत ‘बुलेट’, बीकेसी स्टेशनचे खोदकाम ६०% पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:09 IST2025-01-23T11:08:04+5:302025-01-23T11:09:09+5:30

Mumbai Bullet Train: देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची महामुंबईतील स्थानके, रेल्वे मार्ग, पूल, बोगदे यांची कामे वेगाने सुरू आहेत.

Excavation of 'Bullet', BKC station in Mumbai 60% complete | मुंबईत ‘बुलेट’, बीकेसी स्टेशनचे खोदकाम ६०% पूर्ण

मुंबईत ‘बुलेट’, बीकेसी स्टेशनचे खोदकाम ६०% पूर्ण

 मुंबई -  देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची महामुंबईतील स्थानके, रेल्वे मार्ग, पूल, बोगदे यांची कामे वेगाने सुरू आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) या कॉरिडॉरचे एकमेव भूमिगत स्टेशनचे खोदकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या स्टेशनच्या ६९ पैकी ३ बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. 

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आकार घेत असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी त्याने वेग पकडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रामुख्याने महामुंबईतील तीन जिल्ह्यांमधून बुलेट ट्रेन धावणार असल्याने, तो दोन राज्यांमधील आर्थिक विकासाचा मार्गच ठरणार असल्याचे ते म्हणाले. 

पालघरमध्ये सात बोगदे
बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्टेशन असून, बीकेसी हे एकमेव भूमिगत स्टेशन असणार आहे. या प्रकल्पामध्ये २१ किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी असणार आहे. त्याची सुरुवातही बीकेसी स्टेशनपासून होणार आहे. 

भुयारी मार्गात सात किलोमीटर लांबीचा खाडीखालून बोगदा असणार आहे. यासोबतच पालघर जिल्ह्यातील डोंगरांमधून जाणारे सात बोगदे होणार असून, त्यांचे खोदकामही सुरू आहे.

असा आहे राज्यातील प्रकल्प
- १५६ किमी. बुलेट ट्रेन प्रकल्पाची  राज्यातील एकूण लांबी
-१३५ किमी. उन्नत मार्ग   
- २१ किमी.  भुयारी मार्ग (त्यात ७ किमी खाडीखालून जाणार आहे.) 

असे असेल बीकेसी स्टेशन
जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोल
प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले
स्टेशनमध्ये सहा प्लॅटफॉर्म 

ठाणे रोलिंग स्टॉकचे काम आधीच देण्यात आले आहे. तसेच तेथील जमिनीवरील काम सुरू झाले आहे. ट्रॅकच्या बांधकामाची निविदा काढण्यात आली असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये तांत्रिक निविदा उघडण्याचे नियोजन आहे. 

प्रकल्पामध्ये उन्नत मार्गासाठी लागणाऱ्या गर्डर स्पॅनसाठी पालघरमध्ये कास्टिंग यार्ड सुरू केला असून, ४० मीटरच्या फूल स्पॅन गर्डरद्वारे १०० किमी उन्नत मार्ग बांधला जाईल.

२०२६ मध्ये पहिली ट्रायल रन  
जून २०२६ मध्ये सुरत-बिलिमोरादरम्यान ट्रायल रन घेण्याचे प्रयोजन आहे. भारतात पहिल्यांदाच ३२० च्या वेगाने ट्रेन चालणार असल्याने प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Excavation of 'Bullet', BKC station in Mumbai 60% complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.