‘एव्हरेस्ट’- महेश मांजरेकर यांच्यात ‘कॉपीराइट’ वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:48 IST2025-10-20T09:48:11+5:302025-10-20T09:48:43+5:30
कॉपीराइटसंबंधी बाबींचे उल्लंघन केल्याचा आरोप केले आहेत.

‘एव्हरेस्ट’- महेश मांजरेकर यांच्यात ‘कॉपीराइट’ वाद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीने चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांवर दावा दाखल केला आहे. त्यामुळे दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आमनेसामने उभी ठाकले.
२००९ मध्ये तुफान व्यवसाय केलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘एव्हरेस्ट’ आणि मांजरेकर यांच्यात ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आहे. ‘एव्हरेस्ट’ने मांजरेकर आणि ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या इतर निर्मात्यांविरोधात दावा दाखल केला आहे. त्यात करार तसेच कॉपीराइटसंबंधी बाबींचे उल्लंघन केल्याचा आरोप केले आहेत.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ची मूळ निर्मिती एव्हरेस्ट आणि मांजरेकर यांनी संयुक्तपणे ‘अश्वमी फिल्म्स’खाली केली होती.
आज विशेष खेळ
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर उच्च न्यायालयाने नव्या चित्रपटाच्या निर्मात्यांना ‘एव्हरेस्ट’ला विशेष खेळ दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. २० ऑक्टोबरला चित्रपट पाहिल्यावर गरज भासल्यास ‘एव्हरेस्ट’ला सुटीकालीन न्यायालयात जाण्याची मुभा असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
‘सिनेमा पूर्णपणे स्वतंत्र’
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट-अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा सिनेमा स्वतंत्र आहे. हे प्रसिद्धी उपक्रमांमधून स्पष्टपणे सांगितले आहे. प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. या चित्रपटामुळे कोणाच्याही बौद्धिक अधिकाराचे उल्लंघन केले नसून, सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि चुकीचे आहेत, असे मांजरेकर यांनी सांगितले.