Join us

ऐन दुपारी मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे सायंकाळसारखे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 02:44 IST

गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे होते

मुंबई : राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे १४.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअस एवढे हाेते. मुंबईत दुपारी ढगाळ हवामान नोंदविण्यात आले. ऐन दुपारी मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे सायंकाळसारखे वातावरण झाले आणि जणू काही दुपारीच संध्याकाळ झाल्याचा भास होत होता. सकाळी काही काळ आणि दुपारी दोन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी असेच वातावरण असल्याचे चित्र होते.

गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.दरम्यान, शनिवारी मुंबईची हवा पुन्हा एकदा असमाधानकारक नोंदविण्यात आली. अपुरा सूर्यप्रकाश, ढगांनी केलेली गर्दी, धूळ, धुके आणि धूरके अशा काहीशा वातावरणाने हवेची गुणवत्ता घसरली. चेंबूर, माझगाव आणि मालाड येथील हवा अत्यंत प्रदूषित नोंदविण्यात आली.

चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. मुंबईतही अशीच स्थिती होती. यामुळे किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. किमान तापमान २० अंशांहून २३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.- कृष्णानंद होसाळीकर,  उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

परिसर आणि हवेची गुणवत्ता (पीएम २.५)चेंबूर २०८ (खराब)माझगाव २४२ (खराब)मालाड १९७ (मध्यम)कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)कुलाबा ३१.७, सांताक्रूझ ३३.३

टॅग्स :हवामान