युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 01:59 IST2025-05-12T01:58:35+5:302025-05-12T01:59:04+5:30

नियंत्रण कक्ष २४ तास सुरू, मुंबईतील नागरी संरक्षण दल चार क्षेत्रांत विभागण्यात आले

even though the war is over the civil defence force is on alert mode in mumbai mock drill in societies | युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल

युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झाले आहे. दलाने सध्या विविध रहिवासी संकुलांमध्ये मॉक-ड्रिल आणि ब्लॅक आउटच्या परिस्थितीत काय करायचे, याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. तसेच, दलाचा नियंत्रण कक्षही आता २४ तास सुरू केल्याने फोन कॉल्सची संख्याही वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील नागरी संरक्षण दल चार क्षेत्रांत विभागण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून काळाचौकी, शिवडी, चेंबूर, बोरिवली भगवती हॉस्पिटल, फोर्ट अशा विविध भागातील नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीत काय करावे आणि वाजणाऱ्या वेगवेगळ्या भोंग्याचा (सायरन) अर्थ काय, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पुढील काही दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रमही आखण्यात आले आहेत.

हवाई हल्ल्यासंदर्भात प्रामुख्याने यलो सायरन, रेड सायरन आणि ग्रीन सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले जाते. दिवसा हल्ला होण्याची शक्यता असल्यास काय करावे आणि रात्री ८ नंतर हल्ला होणार असल्यास, जसे की ब्लॅक-आउट, काय करावे, याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जात आहे. याआधी ठराविक कालावधीसाठीच नियंत्रण कक्ष सुरू ठेवले जात असे, मात्र आता तीन शिफ्टमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. नागरिकांना प्रशिक्षणाची आवश्यकता भासल्यास क्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दलातर्फे करण्यात आले आहे.

प्रत्येक क्षेत्र कार्यालयाशी निगडीत जवळपास ५००-५५० अर्धवेळ स्वयंसेवक जोडले गेले आहेत. या सगळ्यांना दररोज एकदा कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीनुसार त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

क्षेत्रनिहाय विभाग

क्षेत्र १ : दक्षिण मुंबई ते काळाचौकी (पालिकेचा ए, बी, सी, डी, ई, जी-दक्षिण विभाग)
क्षेत्र २ : काळाचौकी ते सांताक्रुझ-कुर्ला (पालिकेचा एफ-दक्षिण, एफ उत्तर, एच-पूर्व, एच-पश्चिम, एल विभाग)
क्षेत्र ३ : चेंबूर-मानखुर्द ते मुलुंड मुंबई (पालिकेचा एम-पूर्व, एम-पश्चिम, एन, एस, टी विभाग)
क्षेत्र ४ : विलेपार्ले ते दहिसर (पालिकेचा के -पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर, आर मध्य विभाग)

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवायचा यांची माहिती व्हावी, यासाठी रोज ४-५ ठिकाणी मॉक ड्रिल आणि १० ठिकाणी रात्री ८ वाजता ब्लॅकआउट परिस्थितीत काय करायचे, यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहोत. - नरसिंह यादव, अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण दल

 

Web Title: even though the war is over the civil defence force is on alert mode in mumbai mock drill in societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई