Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीने खाल्ली माती तरी मदतीला धावली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:06 IST

ब्लॅकमेल करणारीविरोधात पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑफिसमध्ये काम करताना तरुण महिला सहकाऱ्याशी झालेले प्रेम, त्यातून वाढलेली जवळीक आणि एका बेसावध क्षणी दोघांमध्ये निर्माण झालेले शारीरिक संबंध. त्यातून झालेल्या गुंतागुतीतून तरुणीने सफाईदारपणे पुरुष सहकाऱ्याकडे बलात्काराच्या नावाखाली मागितलेली खंडणी. धास्तावलेल्या पुरूषाची घालमेल... खरे तर ही कहाणी ऐकून कोणतीही सांसारिक महिला संतापात साताजन्माच्या साथीदारालाच लाथाडेल. पण पतीने माती खाऊनही पत्नी त्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिल्याचा प्रकार विरळाच. भांडुपमध्ये तो उघडकीस आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भांडुपमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीचा संसार सुखाने सुरू होता. दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. मात्र, पतीदेवांचे कार्यालयातील एका महिला सहकाऱ्याशी सूत जुळले. त्यातून जवळीक वाढली. पत्नीला अंधारात ठेवून गुलछबू पतीदेवांच्या या महिला सहकाऱ्याशी भेटीगाठी वाढल्या. त्यातून नको ते घडले आणि एका बेसावध क्षणी दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. हा सर्व प्रकार २०२१ मधला. दरम्यानच्या काळात महिला सहकारी कोलकात्याला राहण्यास गेली. त्यानंतर तिने आपल्या ‘आशिक’कडे पैशांची मागणी सुरू केली. दहा लाख रुपये दे नाही तर आपल्यातील संबंध जगासमोर उघड करेन, बलात्काराचा गुन्हा नोंदवेन, अशा धमक्या ती देऊ लागली. २७ जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत तरुणीने दबाव वाढविल्याने तीन लाख रुपये त्याने दिलेही. मात्र, धमक्यांचे प्रमाण वाढल्याने पती गांगरला.

अन् मतीच गुंग झाली...तरुणीच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी पतीदेवांनी पत्नीलाच साकडे घातले. पतीचा कारनामा ऐकून पत्नीची मतीच गुंग झाली. मात्र, लगेचच स्वत:ला सावरत तिने पदर खोचून पतीदेवांची साथ देण्याचा निर्णय घेतला. पत्नीने संबंधित तरुणीच्या विरोधात १० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार करून कांजूरमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई