Join us

अशाही वाटा! दोन हजारांची नोट मागे घेताच, सोन्याची विक्री तिप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 05:44 IST

गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर / मुंबई : दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पावले सराफांकडे वळली. 3 टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी आणि दागिन्यांची खरेदी केली. शनिवारी सोन्याची विक्री तिप्पट झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळाले आहे.

सकाळपासून सराफांकडे लोकांची गर्दी होऊ लागली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ होऊन दरपातळी ६१,२०० रुपयांवर पोहोचली. दरवाढीनंतरही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींनुसार भारतात सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होतो. ६२,२०० रुपयांपर्यंत वाढलेले सोन्याचे दर १८ व १९ मे रोजी ६०,८०० आणि २० मे रोजी सोन्याचे भाव ४०० रुपयांनी वाढून ६१,४०० रुपयांवर गेले. खरेदी वाढल्याने जोखिम नको म्हणून २ हजारांच्या नोटांनी ५० हजारांपर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून केवायसी व २ लाखांपर्यंत पॅनकार्डची झेरॉक्स बंधनकारक केली. आहे, अशी माहिती नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली.

आधीसारखे नाही

  • ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण देशात लोकामध्ये संतापाची लाट होती. ५०० आणि हजाराची नोट बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या; पण, आता तशी परिस्थिती नाही.
  • नोटा बदलवून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अन्य चलन सुरु असल्याने लोकांच्या व्यवहारावर परिणाम होणार नाही.
  • ३ ते ४ वर्षांपासून एटीएममधून २ हजारांची नोट निघत नाही. त्यामुळे श्रीमंत वगळता सामान्यांकडे या नोटा नाहीतच. अनिश्चिततेमुळे सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोने खरेदीकडे वळल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.
टॅग्स :सोनंनोटाबंदी