आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:43 AM2023-08-26T08:43:03+5:302023-08-26T08:43:19+5:30

भाजप आमदार नारायण कुचे यांनी घेतली माघार

Even MLAs and ministers cannot afford Mhada houses Will the Union Minister of State buy a house worth seven and a half crores? | आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्याच आठवड्यात मुंबई म्हाडा मंडळातर्फे चार हजार घरांची लॉटरी काढण्यात आली. त्यात आम जनतेबरोबरच आमदार आणि मंत्र्यांनीही नशीब अजमावून पाहिले. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी ताडदेव येथील घरांसाठी अर्ज दाखल केला होता. आमदार कुचे यांना ताडदेवचे घर लागले खरे; परंतु किंमत परवडत नसल्याचे सांगत त्यांनी माघार घेतली आहे. आता प्रतीक्षा यादीत असलेल्या कराड यांचा या घरासाठी नंबर लागला आहे. साडेसात कोटी रुपये किमतीच्या या घरासाठी कराड काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाच्या लॉटरीत अनेकांना घरे लागली. या लॉटरीत लोकप्रतिनिधी या श्रेणीत आमदार कुचे यांना ताडदेव येथील क्रिस्टल टॉवरमधील साडेसात कोटी रुपयांचे घर लागले; तर भागवत कराड हे प्रतीक्षा यादीवरील विजेते उमेदवार होते. आमदार कुचे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज भरला होता.

कुचे यांना किंमत माहीत नव्हती?

म्हाडाचा अर्ज भरतेवेळी ज्या श्रेणीत घरांसाठी अर्ज भरला होता, त्यांची किंमत आमदार नारायण कुचे यांना माहीत नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. घरांची किंमत माहीत असतानाही आमदारांनी अर्ज का केला, अशीही चर्चा रंगली आहे. 

सामान्यांचे काय?

म्हाडाच्या विजेत्यांना एकूण १८० दिवसांत म्हाडाच्या घराची संपूर्ण रक्कम भरायची आहे. पहिल्या ३० दिवसांत २५ टक्के, तर उर्वरित दिवसांत ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. विजेत्यांनी वेळेत रक्कम भरली नाही तर त्यांना घर म्हाडाला परत करावे लागणार आहे.

कर्ज कसे मिळणार?

उत्पन्नमर्यादा आणि घराची किंमत यांत मोठा फरक आहे. त्यामुळे विजेत्यांना घर परवडत नसल्याचे चित्र आहे. त्यात गृहकर्जासाठी विजेत्यांनी आता बँकेच्या पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात घराची रक्कम भरण्यासाठी कमी कालावधी असल्याने विजेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

म्हाडाने विजेत्यांना ऑनलाइन स्वीकृतीपत्रे पाठविली असून घर घेणार की नाही, हे म्हाडाला कळविणे बंधनकारक केले. त्यानुसार, कुचे यांनी आर्थिक कारण देत दोन्ही घरे परत केली.

आता क्रिस्टल टॉवर येथील साडेसात कोटींच्या घरांसाठी कराड यांचा नंबर लागला आहे. या संदर्भात कराड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Even MLAs and ministers cannot afford Mhada houses Will the Union Minister of State buy a house worth seven and a half crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.