आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 07:03 IST2025-04-21T07:02:40+5:302025-04-21T07:03:00+5:30

जागतिक बँकेच्या अभ्यासकांनी २०२१ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीत, भारतात लग्नात वधूपक्ष वरपक्षापेक्षा सातपट अधिक खर्च करतो.

Even in Mumbai, the financial capital, girls are becoming victims of dowry | आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले

आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले

मनीषा म्हात्रे
वरिष्ठ प्रतिनिधी

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मी. मुंबईतील सतीशशी विवाह जुळला. मायानगरी मुंबईत मुलीचा सुखी संसार सुरू होणार म्हणून कुटुंबीयही आनंदात होते. लग्नानंतर काही महिन्यांतच हुंड्यासाठी लक्ष्मीचा छळ सुरू झाला. मुलीचा संसार टिकवण्यासाठी तिच्या वडिलांनी कर्ज उचलून पाच लाख रुपये पाठवले. मात्र, पैशांची मागणी कमी होत नव्हती. अखेर, गर्भश्रीमंतीआड दडलेल्या हुंड्याचा फास तिच्याभोवती पण आवळला अन् अवघ्या दोन वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. 

आजही अशा अनेक लक्ष्मी ग्रामीण भागाप्रमाणे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही हुंड्याच्या शिकार ठरताहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी हुंड्याच्या त्रासाला कंटाळून ११ तर २०२३ मध्ये १३ जणींनी टोकाचे पाऊल उचलले. गेल्यावर्षी एकीची हत्या तर ८ जणी हुंडाबळी ठरल्या. मानसिक छळप्रकरणी ४३८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ४१४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. २०२३ मध्ये हाच आकडा ७७६ होता. आकडेवारी कमी दिसली तरी छळ संपलेला नाही. तर हुंड्याव्यतिरिक्त २०२४ मध्ये २२ तर २०२३ मध्ये १८ जणींच्या आत्महत्येची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे.  यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महिलांशी संबंधित १ हजार ७७४ गुन्हे नोंद झाले. त्यात हुंड्यासाठी महिलांच्या मानसिक, शारीरिक छळाचे १२० गुन्हे आहेत. आत्महत्येप्रकरणी ५ तर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका गुन्ह्याची नोंद आहे. 

जागतिक बँकेच्या अभ्यासकांनी २०२१ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीत, भारतात लग्नात वधूपक्ष वरपक्षापेक्षा सातपट अधिक खर्च करतो. १९६० ते २००८ या काळात भारतातल्या ४० हजार लग्नांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला होता. ९५ टक्के लग्नांमध्ये मुलीच्या घरच्यांनी या ना त्या प्रकारे हुंडा दिला होता. भले मग हुंडा देणे-घेणे १९६१ पासून कायद्याने गुन्हा असला तरी. अनेक प्रकरणे फक्त समाजातील बदनामीची भीती आणि स्वतःचा स्टेटस जपण्यासाठी दाबली जात आहेत. मात्र, अत्याचार सहन न करता थेट पोलिसात तक्रारीसाठी येण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिस करतात. तर काही प्रकरणांत फक्त पैसे काढण्यासाठीही खोट्या तक्रारींचा पाढा वाचला जात असल्याचेही समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या महिला कक्षाकडून कौटुंबिक हिंसाचार, हुंड्याशी निगडीत इतर गुन्ह्यांचा तपास तसेच तक्रार अर्जांची चौकशी आणि निपटारा केला जातो. मात्र, आजही झोपडपट्टी ते उच्चभ्रू इमारतीपर्यंत हुंड्यासाठी लागलेल्या वाळवीला हटवण्याचे आव्हान कायम आहे.

Web Title: Even in Mumbai, the financial capital, girls are becoming victims of dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.