आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे! शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:50 IST2025-11-04T09:49:57+5:302025-11-04T09:50:10+5:30
माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता, असे नंतर दिले स्पष्टीकरण

आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे! शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिंदेसेनेचे मागाठाणेचे आ. प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. “मराठी माझी आई आहे आणि हिंदी माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे; कारण आईपेक्षा मावशी जास्त प्रेम करते,” असे वादग्रस्त वक्तव्य सुर्वे यांनी सोमवारी उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात केले.
‘उत्तर भारतीयांनी माझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले, असेच प्रेम माझ्या अन्य सहकाऱ्यांवरही करा,’ असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ मनसेच्या नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. वाद वाढल्यानंतर सुर्वे यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवावे, असे मत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी यावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. तर सुर्वे कोणत्या संदर्भात बोलले हे मी ऐकले नाही, पण महाराष्ट्रात मराठीच प्रथम असणार, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
खेद वाटताे : सुर्वे
आई देवाचे रूप असते. माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. आई नसल्यास मावशी प्रेम करते, एवढाच अर्थ होता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद वाटतो, असे ते म्हणाले.
विरोधक आक्रमक
२०२२ मध्येच या लोकांनी मूळ शिवसेना सोडली.  बाळासाहेब ठाकरे यांनी  माय मराठीसाठी संघर्ष केला. त्यांच्याच पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या सुर्वे यांचे  विधान बाळासाहेबांनाही त्रास देणारे आहे. आई मेली तरी चालेल, असे म्हणणारा मुलगा न जन्मलेलाच बरा. ही मतांसाठी लाचारी करणारी जमात आहे.
- किशोरी पेडणेकर, नेत्या, उद्धवसेना
मराठी मरो ही भावना राज्यातील बारा कोटी जनतेच्या मनात येणार नाही. अशी भावना व्यक्त करणारा व्यक्ती आणि त्याचा पक्ष हा महाराष्ट्र द्रोहीच म्हणाला लागेल. मराठी केवळ भाषा नाही, ती संस्कृती आहे, ताे इतिहास आहे, मराठी आमची अस्मिता आहे. महाराष्ट्राची जनता या घोर अवमानाचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही.
- सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते, मुंबई काँग्रेस
स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी ज्या मराठी भाषेने आपल्यावर प्रेम केले जे आपल्या आई समान आहे ती मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे असे बोलणाऱ्यांचा मतदार योग्य निकाल लावतील. आम्ही हिंदीचा इतका द्वेष करत नाही हेही लक्षात ठेवा. शिवाय मतांच्या लाचारीसाठी आपण कोणती पातळी गाठावी याचा विचार ज्या त्या नेत्याने करावा. 
- बाळा नांदगावकर, ज्येष्ठ नेते, मनसे