अतिवृष्टी झाली तरी मुंबईत आता पाणी तुंबणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:17 IST2023-08-28T06:09:35+5:302023-08-28T07:17:49+5:30
‘ए’ वॉर्डातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील सुरक्षा उद्यान व मादाम कामा मार्गावरील जवाहरलाल नेहरू उद्यान या सुशोभीकरण केलेल्या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले.

अतिवृष्टी झाली तरी मुंबईत आता पाणी तुंबणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : अतिवृष्टी झाल्यास पृष्ठभागावर साचलेले पाणी भूगर्भात साठवण्याची व्यवस्था जपानच्या टोकियो शहरात आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबत नाही. जपान सरकारच्या मदतीने मुंबईत तशी योजना आम्ही करणार आहोत. ही व्यवस्था निर्माण झाल्यास आगामी काळात अतिवृष्टीत मुंबई डुबली, बुडली हे चित्र दिसणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘ए’ वॉर्डातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील सुरक्षा उद्यान व मादाम कामा मार्गावरील जवाहरलाल नेहरू उद्यान या सुशोभीकरण केलेल्या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुंबई पूरमुक्त करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या योजनेची त्यांनी ही माहिती दिली. मुंबईत २० चौरस मीटर क्षेत्रफळातील उद्याने विकसित केली जाणार असल्याचे सांगत, मेट्रो प्रकल्प, ट्रान्स हार्बर लिंक, सागरी सेतू, सागरी मार्ग या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबई सुशोभीकरणाची योजना आखली आहे. त्यामुळे काहींच्या पोटात दुखत आहे. ही मंडळी काहीही टिप्पणी करत आहेत, परंतु आमच्यावर काही फरक पडत नाही, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिदा नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारसू कफ परेड आणि कुलाबा निवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
समुद्राच्या स्वच्छतेसाठी....
मुंबईत अतिवृष्टी झाली आणि त्याचवेळेस भरती असेल तर शहरात साचलेले पाणी बाहेर टाकले जात नाही, उलट समुद्रातील पाणी आत येते. टोकियोच्या धर्तीवर हे साचलेले पाणी भूगर्भात साठवता येईल, नंतर समुद्रात सोडता येईल किंवा ते वापरता येईल, असे फडणवीस म्हणाले. समुद्राच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांचीही माहिती त्यांनी दिली. सध्या सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्राचे पाणी घाण होते. यापुढे सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाईल. त्यामुळे समुद्र घाण होणार नाही, समुद्रातील जैवविविधतेची हानी होणार नाही. या प्रकल्पाचे कार्यादेश काढण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
रिमझिम गिरे सावन...
या उद्यानाजवळ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांचे रिमझिम गिरे सावन हे गाणे चित्रित झाले होते. आज उद्यानाचे लोकार्पण होत असताना रिमझिम सावन सुरू आहे. हा एक योगायोग आहे, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली. या कार्यक्रमात त्या गाण्याचा व्हिडीओही दाखवण्यात आला.