Join us

मेट्रो ३ सुरू होण्यापूर्वीच स्थानकात पाणीच पाणी; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:19 IST

पॅकेज सहामधील सहा स्थानकांचे बांधकाम जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांकडून संयुक्तरीत्या केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी न घेतल्याने कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील तीन स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नव्याने सुरू असलेल्या मेट्रो स्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच या मार्गिकेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचा ठपका ठेवत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांना आता २ कोटी रुपयांचा दंड लावला आहे.

पॅकेज सहामधील सहा स्थानकांचे बांधकाम जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांकडून संयुक्तरीत्या केले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून याचे काम धिम्या गतीने सुरू आहे.  स्थानकात पाणी शिरू नये, यासाठी उपाययोजना कंत्राटदाराकडून करणे अपेक्षित होते. मात्र, या कंत्राटदाराने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ६ जुलै आणि ७ जुलैच्या मध्यरात्री मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकात पाण्याचा प्रवाह शिरल्याचा प्रकार घडला. त्यामुळे मेट्रो स्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाले. कंत्राटदाराने पाणी स्थानकात शिरू नये, यासाठी उपाययोजना केल्या नसल्याचेही समोर आले. बांधकामे झाकलेली नसल्याचेही आढळले. या हलगर्जीपणाबद्दल कंत्राटदाराला दंड लावण्यात आला आहे, अशी माहिती ‘एमएमआरसी’कडून देण्यात आली. 

अन्यथा कठोर कारवाईदरम्यान, आता ‘एमएमआरसी’ने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच स्थानकांची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा कंत्राटदाराला देण्यात आला आहे.

तपासणीला विलंब मेट्रो ३ मार्गिका सुरू करण्यासाठी आरडीएसओ पथकाकडून नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर जुलैच्या मध्यावर सीएमआरएस पथकाकडून मेट्रो मार्गिकेची तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, मेट्रो स्थानकात पाणी शिरून नुकसान झाल्याने त्याचा फटका सीएमआरएस तपासणीला बसू शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :मेट्रो