नवे दर लागू होऊन दहा दिवस उलटले तरी रिक्षा-टॅक्सी मीटरचे अद्ययावतीकरण रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:51 IST2025-02-11T06:50:42+5:302025-02-11T06:51:01+5:30
नव्या भाडेदरानुसार मीटर तपासणीसाठी आरटीओचे टेस्ट ट्रॅक तयार, नव्या भाडेदरांनुसार प्रोटोटाईप प्रोग्रॅमची टेस्टिंग बाकी असल्याने मीटर अद्ययावत करण्यास उशीर सागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवे दर लागू होऊन दहा दिवस उलटले तरी रिक्षा-टॅक्सी मीटरचे अद्ययावतीकरण रखडले
मुंबई - मुंबई महानगर प्रदेशातील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांमध्ये मीटर अद्ययावत केलेल्या रिक्षा-टॅक्सींच्या तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या ट्रॅकवर रिकॅलिब्रेशन म्हणजे नव्या दरानुसार मीटर अद्ययावत केलेल्या रिक्षा आणि टॅक्सींची तपासणी करून त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. परंतु नवे दर लागू होऊन दहा दिवस उलटले तरी अद्याप मीटरचे अद्ययावतीकरण सुरू करण्यात आलेले नाही.
गेल्या महिन्यात मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ केली. त्यानुसार, १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू झाले. परंतु, नव्या भाडेदरांनुसार रिक्षा-टॅक्सींच्या मीटर अद्ययावत करण्यास सुरुवात झालेली नाही. नव्या भाडेदरांनुसार प्रोटोटाईप प्रोग्रॅमची टेस्टिंग बाकी असल्याने मीटर अद्ययावत करण्यास उशीर सागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाखो गाड्यांची तपासणी
मुंबई महानगर प्रदेशात चार लाखांहून अधिक रिक्षा व टॅक्सी आहेत. एका गाडीच्या तपासणीसाठी साधारण २० मिनिटे लागतात. त्यामुळे एप्रिलपर्यंतचा कालावधी अपुरा ठरतो, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस पोपटराव जानकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
परिवहन कार्यालयात बैठक
मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे ३ ते ४ लाख रिक्षा आणि टॅक्सींचे मीटर अद्ययावत करण्यासाठी सोमवारी आरटीओ कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मीटर उत्पादक, चाचणी आणि दुरुस्ती संस्थांचे प्रतिनिधी तसेच रिक्षा-टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टेस्ट ट्रॅक कुठे? किती?
मुंबई सेंट्रल - १, वडाळा - २, अंधेरी - ४, बोरिवली - ३ (१ वापरातील आणि २ नवीन तयार करण्यात येणार), ठाणे - १, मीरा-भाईंदर - १, भिवंडी - १
सर्व मीटर उत्पादकांना मीटर चिपचे शुल्क एकसारखे व समान असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवारपासून रिकॅलिब्रेशनला सुरुवात करण्यात येईल. - भरत कळसकर, सचिव, एमएमआरटीए, मुंबई (मध्य)