Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांचे मृत्युनंतरही होतायंत हाल, अंत्यविधीसाठी ७ ते ८ तासांची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 20:26 IST

मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मालाड (पूर्व) येथील एका खाजगी  इस्पितळात आज सकाळी ११.३० वाजता येथील एका जेष्ठ नागरिकाचे(७९) निधन झाले. गेल्या आठवड्यात ते कोरोना बाधीत असल्याचे निदर्शनास आले होते.आज त्यांचा मृतदेह  दुपारी ३.१५ वा ओशिवरा येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. परंतू तिथे आधीच अंत्यसंस्काराला रांगा असल्याने त्यांचा नंबर लागेपर्यंत रात्रीचे आठ ते साडे आठ वाजतील असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी बोरीवली येथे चौकशी केली असता तिथे कमी वेळ प्रतिक्षा करावी लागेल असं‌ कळल्याने हा मृतदेह बोरीवलीच्या स्मशानभूमीत नेण्यात आला.तिथे सुद्धा अजून दोन ते अडीच तास थांबावे‌ लागेल असे सांगण्यात आले.थोडक्यात करोनाबाधित रुग्णांचे मृत्युनंतरही हाल चालू असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक क्लेशात आणखी भर पडली आहे अशी निराशाजनक प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.

मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाचा  एक अविभाज्य भाग असून त्यात सुसुत्रता असणे आवश्यक आहे. मुंबईत जर दररोज कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढत असेल तर मुंबईतील विविध स्मशानभूमीत कोणत्याही क्षणी किती मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आले आहेत आणि अंत्यसंस्कारला किती वेळ लागेल याची एकत्रित माहिती सॉफ्टवेअर द्वारे इस्पितळांना आणि रुग्णांच्या  कुटुंबियांना मिळण्याची सुविधा पालिका प्रशासनाने केली पाहिजे.अंत्यसंस्काराला किती वेळ लागेल याची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पालिकेने यासाठी एक टोल नंबर कार्यन्वित करणे गरजेचे आहे.त्यामुळे मृत्युनंतरही या स्मशानभूमीतुन त्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी होणारी अशी  परवड थांबेल असे मत त्यांच्या कुटुंबियानी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस