लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आता मेट्रो आणि मोनो मार्गिकेवरही इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या बॅटरी बदलण्याची सुविधा मिळणार आहे. महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) २५ मेट्रो स्थानके आणि ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी खासगी कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. यातील पहिले ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन दहिसर मेट्रो स्थानकावर कार्यान्वित झाले आहे. त्यातून लास्ट माईल कनेक्टीव्हीटीला चालना देण्याचा एमएमएमओसीएलचा प्रयत्न आहे.
यासाठी ‘एमएमएमओसीएल’ जपानच्या होंडा मोटर कंपनीची उपकंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडियाशी भागीदारी केली आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले.
यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे वापरकर्ते चार्जिंग संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ईबॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊन पुढील प्रवास करू शकतात. तसेच, यातून एमएमएमओसीएलला सुमारे ३० लाखांचे उत्पन्नही मिळणार आहे.
नियोजित स्वॅपिंग स्टेशन्स
- मेट्रो ७ मार्गिका - गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान.
- मेट्रो २अ मार्गिका - दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम.
- मोनोरेल - संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर.
मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकांजवळ उभारण्यात येणाऱ्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्समुळे डिलिव्हरी कर्मचारी, रोज प्रवास करणारे नागरिक आणि फ्लीट ऑपरेटर यांना ईव्हीकडे वळण्यास मोठी चालना मिळेल.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
शाश्वत, कमी उत्सर्जनाची नागरी परिसंस्था उभारण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर बॅटरी स्वॅपिंगची जलद सुविधा उपलब्ध करून भविष्यसज्ज वाहतूक व्यवस्थेचा पाया घालत आहोत. पहिले ईस्वॅप केंद्र दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर कार्यान्वित झाले आहे. मुंबईत आणखी ३० ठिकाणी ही सुविधा सुरू केली जात आहे.-डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए