राज्यातील सर्व खाणींचे तीन महिन्यांत ईटीएस मॅपिंग होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:57 IST2026-03-24T09:56:54+5:302026-03-24T09:57:25+5:30

सुरू असलेल्या अवैध खाणी तत्काळ बंद करणार

ets mapping of all mines in the state will be done within three months | राज्यातील सर्व खाणींचे तीन महिन्यांत ईटीएस मॅपिंग होणार

राज्यातील सर्व खाणींचे तीन महिन्यांत ईटीएस मॅपिंग होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खाणी सुरू असून त्या तत्काळ बंद केल्या जातील, तसेच सर्व खाणींचे ईटीएस मॅपिंग (डिजिटल प्रणालीद्वारे सर्व्हे) केले जाईल, असे महसूलमंत्री बावनुकळे यांनी विधानसभेत जाहीर केले.

रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उद्धवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. अनेक ठिकाणी पर्यावरणाची परवानगी न घेता उत्खनन होत असून सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे सांगत यावर कारवाई करण्याची मागणी प्रभू यांनी केली. तक्रार केल्यानंतर काही काळासाठी काम थांबवले जाते, नाममात्र कारवाई केली जाते आणि पुन्हा उत्खनन सुरू होते, असेही त्यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी खाणपट्ट्यांची वैधता तपासली गेली नाही, पर्यावरण परवानगी घेतली नाही, मायनिंग झोनचे नियोजन झाले नाही आणि स्वामित्वाचा आगाऊ भरणा घेतला गेला नाही. काही ठिकाणी कागदपत्रे नसतानाही परवानगी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. रायगड, ठाणे आणि पालघर भागात डोंगर पोखरले गेले असून यात मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी चौकशी करून अहवाल देणार

राज्यातील गौण खनिज उत्खननाचा खरा आकडा मिळवण्यासाठी संपूर्ण राज्याचे ईटीएस मॅपिंग पुढील तीन महिन्यांत केले जाईल. त्यानंतर अवैध खाणींवर बंदी घालण्यात येईल. 

तसेच मागील पाच वर्षांत दिलेल्या परवानगींची चौकशी केली जाईल आणि जिथे अनियमितता आढळेल तिथे कारवाई होईल. ज्यांच्याकडे वैध परवाना, स्फोटक विभागाची किंवा पर्यावरणाची परवानगी नाही, त्या सर्व खाणी बंद करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसांत सर्व खाणींची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चांदिवलीत डोंगर खोदून अवैध बांधकाम सुरू

शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातही डोंगर खोदून अवैध बांधकाम सुरू असल्याचा आरोप केला. रात्री वाहतूक पोलिस स्वतःट्रकना संरक्षण देत असल्याचे ते म्हणाले. 

यावर बावनकुळे म्हणाले की, ज्या मतदारसंघांत असे प्रकार सुरू असतील त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. राज्यात सुरू असलेली ही लूट सर्वांनी मिळून थांबवली पाहिजे. वैध पद्धतीने जेवढे गौणखनिज आवश्यक आहे ते दिले जाईल, मात्र अवैध उत्खनन पूर्णपणे बंद केले जाईल.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही राज्यातील अवैध उत्खननावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: ets mapping of all mines in the state will be done within three months