स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

By जयंत होवाळ | Published: February 24, 2024 08:23 PM2024-02-24T20:23:06+5:302024-02-24T20:24:25+5:30

स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला.

Epidemic diseases have been prevented due to cleanliness drive, Mumbai Municipal Commissioner claims | स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

मुंबई : १३ आठवड्यांपासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचे सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत. खालावलेला हवेचा दर्जा हळूहळू उंचावत असून, प्रदूषण झपाट्याने कमी झाले आहे. हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण देशासाठी आदर्शवत ठरत आहे. स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला.

आयुक्तांनी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेचा पाहणी दौरा केला. ही मोहीम निरंतर चालणार असून, कोणत्याही टप्प्यावर थांबणार नाही. याची व्याप्ती हळूहळू वाढवीत आहोत. जोपर्यंत नागरिकांचा अपेक्षित सहभाग वाढत नाही तोपर्यंत स्वच्छता मोहीम यशस्वी होणार नाही. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेची लोकचळवळ बळकट करावी, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. चहल यांनी जी उत्तर विभागातील धारावी-कुंभारवाडा परिसरातील पदपथ; एफ उत्तर विभागातील शीव येथील स्मशानभूमी, प्रभादेवी येथील पी. बाळू चौपाटीची स्वच्छता केली. 

त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यवाहीची तपासणी केली. प्रसाधनगृहात पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रभादेवी येथील पी. बाळू चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त प्रत्यक्ष सहभागी झाले. या ठिकाणच्या संरक्षक भिंतीची आवश्यक तिथे तातडीने डागडुजी, रंगरंगोटी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमी स्मारकास भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

अडीच हजार मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन
महानगरपालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे वाढलेले हवा प्रदूषण आता नियंत्रणात आले आहे. हा एक राष्ट्रीय विक्रम असून, त्यात सखोल स्वच्छता मोहिमेचा सिंहाचा वाटा आहे. ९ ते १० आठवड्यांमध्ये प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्वच्छतेकामी पिंजून काढण्याचे लक्ष्य आहे. सध्या झोपडपट्टी आणि तत्सम परिसरातील लहानसहान रस्ते, पदपथ कचरामुक्त - धूळमुक्त करून ब्रशिंग केले जात आहेत. त्यानंतर पाण्याने धुवून काढण्यात येत आहेत. मागच्या आठवड्यात झोपडपट्टी भागातून अडीच हजार मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
 

Web Title: Epidemic diseases have been prevented due to cleanliness drive, Mumbai Municipal Commissioner claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.