विद्यापीठाच्या कलिना संकुलात अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी; बुम बॅरिअर सुविधा कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:42 IST2025-08-01T11:41:27+5:302025-08-01T11:42:15+5:30
अन्य वाहनांना चौकशी करून आत सोडले जाणार आहे.

विद्यापीठाच्या कलिना संकुलात अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी; बुम बॅरिअर सुविधा कार्यान्वित
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाणार आहे. त्यासाठी संकुलात गुरुवारपासून बुम बॅरिअर सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) स्टिकर लावलेल्या वाहनांनाच आत प्रवेश दिला जाणार आहे. अन्य वाहनांना चौकशी करून आत सोडले जाणार आहे.
विद्यापीठ चौकात होणारी कोंडी टाळण्यासाठी, तसेच कुर्ला, बीकेसी आणि सांताक्रुझ दिशेला जलदरित्या पोहोचता यावे, यासाठी वाहनांकडून विद्यापीठातील अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात होता. या वाहनांना आता चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठात बेकायदेशीररित्या आलेल्या व्यक्तींमुळे होणारे अनुचित प्रकार रोखता येणार आहेत.
बुम बॅरिअर कशासाठी?
विद्यानगरी संकुलात विविध शैक्षणिक विभाग संकुल, प्रशासकीय कार्यालये, शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी - कर्मचारी सदनिका आणि विद्यार्थी वसतिगृह आहेत. संकुलातील तिन्ही प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते. त्यामुळे कोणताही अनूचित प्रक्रार घडू नये, तसेच अनधिकृत वाहनांची वाहतूक थांबवता यावी, यासाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
कर्मचाऱ्यांना दिले आरएफआयडी स्टिकर्स
यानुषंगाने सुरक्षा विभागाने विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाहनांवर लावण्यासाठी आरएफआयडी स्टिकर्स दिले आहेत. अशा वाहनांची लांबूनच पडताळणी होऊन आत थेट प्रवेश मिळेल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात आणि किरण वसावे यांच्या उपस्थितीत नुकतेच या सुविधेचे उदघाटन होते.