कोस्टल रोडवरील धून असलेल्या पाचशे मीटर मार्गिकेत 'प्रवेश बंद'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:11 IST2026-03-31T12:10:55+5:302026-03-31T12:11:14+5:30
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पालिकेने धून बंद केली होती.

कोस्टल रोडवरील धून असलेल्या पाचशे मीटर मार्गिकेत 'प्रवेश बंद'
मुंबई : कोस्टल रोडवरील काही पट्टयात 'जय हो' या मेलडी धूनचा स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत पालिकेने धून बंद केली. मात्र आता या पट्ट्यातील ५०० मीटर मार्गिकेवर वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
जर विशिष्ट वेळी धून बंद करण्यात आली असेल, तर वाहनांसाठी मार्गिका बंद कशासाठी करण्यात आली, असा सवाल आता निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या ५०० मीटर भागापुरते बॅरिकेडिंग करण्याचे ठरविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त उर्वरित वेळेत या मार्गावरून नियमितपणे वाहतूक सुरू राहील. तसेच, परिसरातील रहिवाशांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी केली असता या ठिकाणी आवाज हा निर्धारित डेसिबल मर्यादेत असल्याचे आढळून आले आहे, असा पालिकेचा दावा आहे.
नागरिकांना वाहन चालविताना या रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धूनचा आस्वाद घेता यावा व करमणूक व्हावी, या उद्देशाने हा रस्ता विकसित करण्यात आला आहे. या मेलडी मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.