अभियंत्याची शिक्षा कायम, सत्र न्यायालयाचा निकाल; माजी नगरसेविकेस पाठवले होते आक्षेपार्ह मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 07:50 IST2025-02-21T07:49:39+5:302025-02-21T07:50:40+5:30
शिवसेनेच्या बोरिवली येथील तत्कालीन नगरसेविकेच्या घरी २६ जानेवारी २०१६ रोजी पूजा होती. त्यादिवशी रात्री ११:३०च्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून २०-२५ मेसेज आले होते.

अभियंत्याची शिक्षा कायम, सत्र न्यायालयाचा निकाल; माजी नगरसेविकेस पाठवले होते आक्षेपार्ह मेसेज
मुंबई : अनोळखी महिलेला ‘तू स्मार्ट आहेस, तू स्लिम आहेस, तुझा विवाह झाला का? मला तू आवडतेस’, असे व्हॉट्सॲप संदेश पाठवणे हा तिच्या विनयशीलतेचा अपमान आहे, असे नमूद करत दिंडोशी सत्र न्यायालयाने महापालिकेच्या एका अभियंत्याला सुनावलेली तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली. या अभियंत्याने माजी नगरसेविकेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती.
शिवसेनेच्या बोरिवली येथील तत्कालीन नगरसेविकेच्या घरी २६ जानेवारी २०१६ रोजी पूजा होती. त्यादिवशी रात्री ११:३०च्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून २०-२५ मेसेज आले होते. त्यात वर उल्लेख केलेल्या मसेजबरोबरच ‘मी ४० वर्षांचा आहे, तू झोपली आहेस का? आपण उद्या भेटू, असेही म्हटले होते. हे मेसेज नगरसेवीकेने तिच्या पतीला दाखविले. त्यावर पतीने संबधित नंबरवर फोन करण्यास सांगितले.
नगरसेविकेने कॉल केला. मात्र, अभियंत्याने कॉल न घेता तिला पुन्हा मेसेज केला.
‘मी रात्री कॉल घेत नाही. मला व्हॉट्सॲपवर बोलायला आवडते.ऑनलाईन ये,’ असे मेसेज केले होते. हा नंबर नरसिंह गुडे याचा होता.
युक्तिवाद फेटाळला
नगरसेविकेने घटनेच्याच दिवशी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तर आरोपीने नगरसेविका आणि तिच्या पतीने राजकीय वैमनस्यातून आपल्याविरोधात तक्रार केल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला.
न्यायालयाचे निरीक्षण काय?
मेसेज आणि फोटो खरोखरच ‘अश्लील’ आहेत. तक्रारदार किंवा तिचा माजी नगरसेवक पती यांचा आरोपीशी काहीही संबंध नाही. कोणतीही विवाहित महिला आणि तिचा पती जे नगरसेवक होते, अशा प्रकारे रात्री ११:३० ते १२:३० च्या दरम्यान आलेले अश्लील मेसेज सहन करू शकत नाहीत.
विशेषत: मेसेज पाठविणाऱ्याशी त्यांचा काहीही संबंध नसताना. हे मेसेज आणि फोटो महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करणारे आहेत, असे नमूद करत
अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला सुनावलेली तीन महिने कारावासाची शिक्षा कायम ठेवली.