म्हाडातील इंजिनीअर तीन वर्षेच कार्यकारी, धोरणामुळे मोक्याच्या नियुक्तींना चाप बसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 06:28 IST2025-04-04T06:27:55+5:302025-04-04T06:28:18+5:30
MHADA: म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार, जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारी पदी केवळ तीन वर्षे राहता येणार आहे.

म्हाडातील इंजिनीअर तीन वर्षेच कार्यकारी, धोरणामुळे मोक्याच्या नियुक्तींना चाप बसणार
मुंबई - म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार, जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारी पदी केवळ तीन वर्षे राहता येणार आहे. कोणत्याही गटातील एका पदावरील सेवा सलग तीन वर्षांपेक्षा जास्त वाढवायची असेल त्याला शासनाची मान्यता घ्यावी लागेल.
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अ, ब आणि क अशी तीन गटांत विभागणी करण्यात आली आहे. अ गटातील कोणत्याही एका कार्यालयातील सलग सेवा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षे, तर संपूर्ण कालावधीसाठी सहा वर्षे आहे. अ गटात तीन वर्षे सेवा झाल्यानंतर अन्य दोन गटांत तीन वर्षे सेवा द्यावी लागेल; तेव्हा अ गटात पुन्हा नियुक्ती होईल. ब गटातील कार्यालयात सलग सेवा कालावधी किमान तीन वर्षे व संपूर्ण कालावधीसाठी सेवा ९ वर्षे असेल.
म्हाडा किंवा एसआरएमध्ये अभियंता हे अत्यंत मोक्याचे मानले जाते. या पदांवरील नियुक्तीसाठी किंवा नियुक्ती कायम राहावी म्हणून राजकीय वरदहस्त वापरला जातो.
राजकीय हस्तक्षेप मोडीत निघणार
मध्यंतरी अनेकांनी महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीसाठी राजकीय वजन वापरल्याचे समोर आले होते. परिणामी हा हस्तक्षेप मोडून काढता यावा म्हणून गृहनिर्माण विभागाने धोरण तयार केले होते. त्यानुसार आता शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, अभियंत्याला महत्त्वाच्या ठिकाणी किमान तीन वर्षे, तर संपूर्ण कारकिर्दीत कमाल सहा वर्षे राहता येईल.
यासंदर्भातील तरतुदी तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता संवर्गापासून उपमुख्य अभियंता सवंर्गापर्यंत सर्वांना लागू आहे. या बदल्या झाल्यानंतर सेवा वर्ग करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे.